गाडीतून शेतकऱ्याचे तीन लाख लंपास
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2019 11:11 PM2019-12-26T23:11:31+5:302019-12-26T23:11:57+5:30
लुटण्याच्या सर्रास घटना : गुन्हा दाखल
मीरा रोड : बेकायदा शेअर भाडे घेणाºया खाजगी गाडीचालकांकडून आता प्रवाशांच्या मौल्यवान वस्तू चोरण्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत. गुजरातहून आलेल्या एका शेतकºयाचे ३ लाख ३० हजार अशाच एका गाडीचालक व साथीदाराने लंपास केल्याचा गुन्हा काशिमीरा पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे.
मीरा रोड रेल्वे स्थानक, भार्इंदरचे सावरकर चौक (गोल्डन नेस्ट), काशिमीरा नाका, वरसावे नाका आदी ठिकाणी वरील बसस्थानक परिसरातून काही गाडी चालक बेकायदा प्रवासी भाडे घेतात. मुंबई, ठाण्यासह वसई भागात हे चालक प्रवाशांना सोडतात. शेअर पध्दतीने चालणारी ही वाहतूक बेकायदा असली तरी प्रादेशिक परिवहन व वाहतूक पोलिसांच्या वरदहस्ताने ती राजरोस चालवली जाते. अशा भाडे नेणाºया गाडी चालकांकडून प्रवाशांना लुटण्याचे प्रकार घडतात.
गुजरातच्या लिमडी तालुक्यातील शेतकरी किरण बुटिया (५५) हे मेव्हण्याची मुलगी मंजू व नात दिपीका हे बसने २३ डिसेंबर रोजी वरसावे नाका येथे उतरले. त्यांचा मुलगा ऐरोली येथे राहात असून चाळीत खोली घेण्यासाठी म्हणून ३ लाख ३० हजारांची रक्कम मुलाला देण्यासाठी बुटिया यांनी सोबत आणली होती. बससाठी थांबले असता तेथे एका गाडी चालकाने शेअर पध्दतीने कळवा नाका येथे सोडतो असे सांगितले. त्यानुसार ते तिघे गाडीत बसले. आधीच एक महिला त्यात बसली होती. नंतर आत जागा नसताना चालकाने त्याचा एक सहकारी मागच्या सीटमागील मोकळ्या जागेत बसवला. त्या ठिकाणी आधीच चालकाने बुटिया यांची पैसे ठेवलेली बॅग ठेवण्यास सांगितले होते.
माजिवडा नाका येथे पोहताच चालकाने मला मालकाने तात्काळ बोरिवलीला बोलावल्याचे सांगून बुटिया आदींना खाली उतरवले. मागे बसलेला चालकाचा सहकारीही उतरून निघून गेला. चालकाने बॅग बुटिया यांच्या हातात देऊन निघून गेला. त्यांनी बॅग उघडली असता आतील रक्कम चोरीला गेली होती.