'शेतकरी कायदा रद्द होणार नाही, आंदोलनकर्ते राजकीय पक्षांचे'; रामदास आठवलेंची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2020 04:53 PM2020-12-10T16:53:04+5:302020-12-10T16:53:09+5:30
शेतकरी आंदोलनाच्या पार्शवभूमीवर आठवले यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे शेतकऱ्यांसह राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
- नितिन पंडीत
भिवंडी: दिल्लीत सुरु असलेले शेतकरी अंदोलन हे शेतकऱ्यांचे आंदोलन नसून ते राजकीय पक्षांचे व राजकीय संघटनांचे आंदोलन आहे. त्यामुळे या आंदोलनात देशभरातील शेतकरी सामील नसून केंद्र शासनाने शेतकऱ्यांसाठी पारित केलेला शेतकरी कायदा रद्द होणार नाही. असे वक्त्याव केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी बुधवारी भिवंडी एका खासगी कंपनीच्या कार्यालय उदघाटनाप्रसंगी केले आहे. शेतकरी आंदोलनाच्या पार्शवभूमीवर आठवले यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे शेतकऱ्यांसह राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले हे भिवंडी तालुक्यातील गुंदवली गावात असलेल्या गोदाम संकुलनात उभारलेल्या मास्टर मॉडलिंग या कंपनीच्या उदघाटन सोहळ्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना शेतकरी आंदोलनावर वरील वक्तव्य केले.
मोदी सरकारने नव्याने कृषी कायदा लागू केला. मात्र या कायद्यामुळे शेतकरी देशोधडीला लागतील आणि भांडवलदार मलाई खातील असा देशभरातील शेतकऱ्यांनी एल्ल्गार पुकारत गेल्या १५ दिवसापासून दिल्लीत कृषी कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी अंदोलन सुरु केले आहे. मात्र भाजप नेत्यांसह त्यांचे मित्र पक्षातील नेत्यांनीही कृषी कायदा रद्द होणार नाही. असे वारंवार विधान करीत आहेत. त्यामुळे हा वाद आणखीच चिघळला आहे. त्यातच केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनीही भाजप नेत्याप्रमाणे कृषी कायदा रद्द होणार नाही. मात्र त्यामध्ये सुधारणा होऊ शकते. असे सांगत केंद्र सरकाराने लागू केलेल्या कृषी कायदाची पाठराखण केली.
केंद्रातील मोदी सरकारने कृषी कायदा शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी लागू केला. मात्र मोदी सरकारच्या विरोधात असलेल्या सर्वच राजकीय पक्ष शेतकरी आंदोलनाच्या आड मोदी सरकारला बदनाम करण्याचा डाव रचत असल्याचेही रामदास आठवले यांनी आरोप करीत विरोधकांवर निशाणा साधला. तर लवकरच कृषी कायदावर केंद्र सरकार तोडगा काढून शेतकऱ्यांचे अंदोलन थांबविण्यात यशस्वी होतील असा अशावाद शेवटी आठवले यांनी व्यक्त केला आहे.