शेतकऱ्यांना बांधावरची तूर लागवड फायद्याची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2020 11:55 PM2020-12-14T23:55:51+5:302020-12-14T23:55:55+5:30
भविष्यात भाताबरोबर तूरलागवड क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ होईल.
बोर्डी : निसर्गाचे लहरी हवामान व पावसामुळे खरिपातील भातपिकाचे नुकसान होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी बांधावर तूर लागवड केल्यास नुकसानीचे प्रमाण कमी होऊन आधार मिळत असल्याचा प्रत्यय शेतकऱ्यांना आला आहे. काही वर्षांपासून परतीच्या पावसाने खरिपातील भातपिकाचे नुकसान होत आहे. शेतकऱ्याला आर्थिक हातभार देण्यासाठी यंदाच्या खरीप हंगामात भातासोबत तूर बियाण्याचे वाटप करण्यात आले. भविष्यात भाताबरोबर तूरलागवड क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ होईल. दुर्गम आदिवासी भागात रोजच्या आहारात या डाळींचा समावेश झाल्यास कुपोषणाच्या मुक्तीसाठी हातभार लागेल, असे तालुका कृषी अधिकारी संतोष पवार यांनी सांगितले.
महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना राष्ट्रीय कृषी विकास योजना, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान, तसेच नावीन्यपूर्ण बाब म्हणून आदिवासी उपयोजनेतून चार हजार ४१० किलो बियाणे बांधावर तुरीच्या लागवडीसाठी विनामूल्य वाटप करण्यात आलेले आहेत. त्यापैकी डहाणू तालुक्यात एकूण ७५० एकर क्षेत्रावर बांधावर तुरीची लागवड केलेली आहे. सध्या तुरीच्या शेंगा परिपक्व होण्याच्या अवस्थेत आहेत. तुरीच्या अतिरिक्त पिकामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होणार आहे. यामधून साधारणत: एकरी १२० ते १३० किलो उत्पादन मिळणार आहे. तुरीची या वर्षीची लागवड आणि उत्पन्न यांची तुलना केल्यास शेतकरी समाधानी आहेत. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व उपविभागीय कृषी अधिकारी, पालघर यांच्या मार्गदर्शनाखाली ही योजना प्रोत्साहन म्हणून राबविण्यात आली. जूनमध्ये क्षेत्रीय कर्मचाऱ्यांमार्फत प्रति कुटुंब २५० ग्रॅम तूर बियाणे शेतकऱ्यांना घरपोच देण्यात आले. सहा महिन्यांत शेतीशाळेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. अतिवृष्टीमुळे भातपिकाचे नुकसान झाले आहे, तरी बांधावरील तूर उत्पादनातून शेतकरी वर्षभर खाण्यापुरती डाळ घरी ठेवून उर्वरित विक्री करून चार पैसे मिळवू शकतो, अशी मागणी मंडळ कृषी अधिकारी सुनील बोरसे यांनी दिली.
कृषी विभागामार्फत २५० ग्रॅम तूर बियाणे उपलब्ध झाले. बांधावर लागवड केली असून, चांगले उत्पादन मिळणार आहे. रब्बी हंगामात सात किलो हरभऱ्यापासून ४० ते ५० किलो उत्पादन अपेक्षित आहे.
- शांती रविया दुबळा, शेतकरी, पाटीलपाडा