शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरू; उच्च दाबाच्या वाहिनीसाठी जागा न देण्याचा निर्धार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 11:07 PM2021-02-25T23:07:45+5:302021-02-25T23:08:15+5:30

उच्च दाबाच्या वाहिनीसाठी जागा न देण्याचा निर्धार : पोलीस बळाचा वापर करू पाहत असल्याचा आरोप

Farmers continue to try to suppress the voice | शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरू; उच्च दाबाच्या वाहिनीसाठी जागा न देण्याचा निर्धार

शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरू; उच्च दाबाच्या वाहिनीसाठी जागा न देण्याचा निर्धार

Next

वाडा : तालुक्यातील डाकिवली परिसरातून उच्च दाबाची विद्युत वाहिनी जात असून, या वाहिनीचे मनोरे उभारण्याचे काम महापारेषणने हाती घेतले आहे; मात्र या वाहिनीमुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे. त्यामुळे वाहिनीस तीव्र विरोध दर्शवून जागा न देण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी केल्याने महापारेषण आता पोलीस बळाचा वापर करू पाहात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. 

गुरुवारी काही शेतकऱ्यांना वाडा पोलीस ठाण्यात बोलावून पोलीस निरीक्षक सुधीर संख्ये यांनी समज दिली. शेतकरी ऐकतच नसतील तर पोलीस बंदोबस्त घेऊन सरकारचा प्रकल्प पूर्ण करा, असे महापारेषणच्या अधिकाऱ्यांना संख्ये यांनी सांगितले. यावरून महापारेषण आता पोलीस बळाचा वापर करू पाहात असल्याचे स्पष्ट झाले आहे.

२२० के.व्ही. तारापूर-बोरीवली आणि बोईसर-घोडबंदर-कुडूस अशी उच्च दाबाची विद्युत वाहिनी जात आहे. वाडा, वसई व पालघर या तालुक्यातील गावे यामध्ये बाधित होणार आहेत. त्यासाठी ३० मीटर जागा संपादित करण्यात आली आहे; मात्र हे करताना शेतकऱ्यांना विश्वासात न घेता किंवा पूर्वकल्पना न देता या वाहिनीचे मनोरे उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यातच सन २०१६ साली बनवलेल्या नकाशाप्रमाणे हे काम न करता महापारेषणने मनमानी कारभार करत आपल्या मर्जीप्रमाणे काम सुरू केले आहे. यात डाकिवली गावातील अनेक शेतकरी बाधित झाले आहेत. येथील बहुतांशी शेतकरी अल्पभूधारक असून, बाधित शेतकऱ्यांचे लागवडी क्षेत्र संपुष्टात येणार आहे. ज्या जमिनीतून ही वाहिनी जात आहे,  ती जमीन मातीमोल होणार असल्याने शेतकरी प्रचंड  संतापले आहेत.

शेतकरी तीव्र विरोध करत असल्याचे  महापारेषणच्या लक्षात आल्याने त्यांनी थेट पोलीस ठाणे गाठून शेतकऱ्यांना पोलीस ठाण्यात बोलावून घेतले. पोलीस निरीक्षक सुधीर संख्ये यांनी शेतकऱ्यांना हा सरकारचा प्रकल्प असून, त्याला विरोध करू नका, अशी समज दिली. तर शेतकऱ्यांचे कमीत कमी कसे नुकसान होईल, असे पाहा, असे महापारेषणच्या अधिकाऱ्यांना सांगितले. याउपर शेतकरी ऐकतच नसतील तर पोलीस अधीक्षकांकडून रीतसर पोलीस बंदोबस्त घ्या, असे पारेषणच्या अधिकाऱ्यांना सांगण्यात आले.

Web Title: Farmers continue to try to suppress the voice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी