भिवंडीत भातखरेदी केंद सुरु करण्याची शेतकऱ्यांची मागणी
By नितीन पंडित | Published: November 16, 2022 05:48 PM2022-11-16T17:48:10+5:302022-11-16T17:48:48+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क भिवंडी:दि.१६- राज्य सरकारने तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी दुगाडफाटा ,झिडके ,पडघा येथील हमीभाव भात खरेदी केंद्र सुरू करावे अशी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
भिवंडी:दि.१६- राज्य सरकारने तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी दुगाडफाटा ,झिडके ,पडघा येथील हमीभाव भात खरेदी केंद्र सुरू करावे अशी मागणी प्रगतिशील शेतकरी शिवाजी राऊत यांनी राज्य शासनाकडे केली आहे.विशेष म्हणजे शासन निर्देशाने हे भात खरेदी केंद्र मागील महिन्यातच सुरु करण्याचे निर्देश शासनाने दिले असतांनाही एक महिना उलटल्यानेही हे भट खरेदी केंद्र अजूनही सुरु करण्यात आले नसल्याने तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाले आहेत.
दोन वर्षांपूर्वी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे.मात्र यावर्षी चांगला पाऊस झाल्याने भातपीक चांगले आले आहे.त्यामुळे शेतकरी सुखावला आहे. भातपीक हाती आल्याने हे भात सरकारी हमीभाव खरेदी केंद्रात विकण्यास येतात त्यामुळे भात विकून आपले कर्ज आणि पुढल्या वर्षासाठी कुटुंबाला सांभाळण्यासाठी पुंजी शेतकरी जमा करतो. मात्र दुगाड फाटा,पडघा व झिडके येथील भात खरेदी केंद्र अद्यापी सुरु झालेले नाही.त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे त्यामुळे राज्य सरकारने भात खरेदी केंद्र लवकर सुरु करावे अशी मागणी शेतकरी करीत आहेत .
उधरनिर्वाहासाठी भात विकल्याशिवाय शेतकऱ्यांना पर्याय नाही मात्र त्यासाठी शासनाचे भिवंडी तालुक्यात हमीभाव भात खरेदी केंद्र अद्यापी सुरु झालेले नसल्याने अनेक शेतकरी व्यापाऱ्यांना कमी पैशांमध्ये भात विकत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत असल्याची खंत शेतकरी शिवाजी राऊत यांनी व्यक्त केली आहे.राज्य शासन प्रति क्विंटल २०४० रुपये भाव देत आहे.मात्र बोनसचे ७०० रुपये शेतकऱ्यांना मिळत नसल्याने बोनसचे ७०० रुपये शेतकऱ्यांना मिळावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
भिवंडी तालुक्यात २२ हजार हेक्टर शेतजमीनीवर भाताचे पीक घेण्यात आलेले आहे. २२७ महसुल गावांपैकी १६७ गावांमध्ये भाताचे उत्तम पिक घेतले जात आहे.भात पिकाचे उत्पन्न हाती आल्यावर त्यापैकी अर्ध्याअधिक धानाची विक्री करून शेतकरी सोसायटी किवा बँकाच्या घेतलेल्या कर्जाची परतफेड करून आपल्या कुटूंबाचे गुजरान करीत असतो. त्यासाठी राज्य शासनाने तात्काळ दुगाड,झिडके आणि पडघा येथे भात खरेदी केंद्र सुरु करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी तालुक्यातील शेतकरी करीत आहे.