जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी व्यावसायिक शेतीकडे वळावे !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2020 12:08 AM2020-11-27T00:08:49+5:302020-11-27T00:09:24+5:30
राजेश पाटील : पारंपरिक शेतीमध्ये बदल व्हायला हवा
वसई : पालघर जिल्हा कृषीप्रधान आहे, मात्र येथील बेभरवशाच्या हवामानामुळे जिल्ह्यातील बहुतांश शेतकरीवर्ग हा शेती व्यवसायापासून दुरावत चालला आहे. शेती व्यवसाय टिकवायचा असेल तर जिल्ह्यातील पारंपरिक शेतीमध्ये व्यावसायिक बदल करण्याच्या दृष्टीने प्रयत्न व्हायला हवेत, असे मत आमदार राजेश पाटील यांनी व्यक्त केले.
पालघर जिल्ह्यातील बोटावर मोजण्याइतके शेतकरी सोडले, तर शेती व्यवसायामध्ये प्रचंड उदासीनता निर्माण झाली असल्याची खंत आ. राजेश पाटील यांनी बोलून दाखवली. ही उदासीनता दूर करून व्यावसायिक शेतीसाठी शेतकऱ्यांना उद्युक्त करण्यासाठी बोईसरचे बविआचे आमदार राजेश पाटील यांनी पुढाकार घेऊन महाराष्ट्र शासन कृषी विभाग, कुस्मो ॲग्रो (मुंबई) आणि वर्धन ॲग्रो प्रोसेसिंग लि. सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने ‘विकेल ते पिकेल’ या संकल्पनेवर आधारित पालघर जिल्ह्यात प्रथमच व्यावसायिक दृष्टीने उसाचे क्लस्टर उभे केले आहे.
शेतकऱ्यांचे कुटुंब खऱ्या अर्थाने आर्थिक सुलभता येऊन यशस्वी झाले पाहिजे, यासाठी आता आ. राजेश पाटील यांच्या संकल्पनेतून ऊसलागवडीचा शुभारंभ पालघर तालुक्यातील सातिवली येथील अंकुश देसले यांच्या शेतावर पार पडला. या कार्यक्रमाला वर्धन ॲग्रो प्रोसेसिंग लि.चे अध्यक्ष धैर्यशील दादा कदम तसेच प्रमुख पाहुणे म्हणून वसई-विरार महापालिकेचे माजी महापौर राजीव पाटील उपस्थित होते. त्यांच्यासमवेत विनायक काशीद, संचालक कुस्मो ॲग्रो (आंतरराष्ट्रीय कृषी अभ्यासक), डॉ कृष्णा परब, निर्यातदार आणि सारंग नेरकर, कृषी तंत्रज्ञ हे प्रमुख मार्गदर्शक आदी उपस्थित होते.