उच्च दाबाच्या विद्युत वाहिनीस शेतकऱ्यांनी दर्शवला विरोध, बाधित शेतकऱ्यांनी दिले निवेदन
By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2021 12:49 AM2021-02-03T00:49:27+5:302021-02-03T00:50:02+5:30
वाडा तालुक्यातील डाकिवली परिसरातून उच्चदाबाची विद्युतवाहिनी जात असून या वाहिनीचे मनोरे उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
वाडा : तालुक्यातील डाकिवली परिसरातून उच्चदाबाची विद्युतवाहिनी जात असून या वाहिनीचे मनोरे उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या वाहिनीमुळे शेतकरी देशोधडीला लागणार असल्याने शेतकऱ्यांनी या वाहिनीस विरोध दर्शवला आहे. वाहिनीचे काम बंद करावे. अन्यथा, जनआंदोलन उभारण्याचा इशारा शेतकऱ्यांनी प्रशासनाला तक्रारीद्वारे दिला आहे. २२० के.व्ही. तारापूर-बोरीवली आणि बोईसर-घोडबंदर, लीलो कुडूस अशी उच्च दाबाची विद्युत वाहिनी जात आहे.
वाडा, वसई व पालघर या तालुक्यांतील गावे यामध्ये बाधित होणार आहेत. त्यासाठी ३० मीटर जागा संपादित करण्यात आली आहे. मात्र, हे करताना शेतकऱ्यांना विश्वासात न घेता किंवा पूर्वकल्पना न देता या वाहिनीचे मनोरे उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी या वाहिनीला विरोध दर्शविला आहे. येथील शेतकरी हे अल्पभूधारक शेतकरी असल्याने आणि त्यांच्या लागवडी क्षेत्रातून वाहिनी जात असल्यामुळे बाधित शेतकऱ्यांचे लागवडी क्षेत्र संपुष्टात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. या जागेतून वाहिनी गेल्यास जमीन मातीमोल होणार असल्याने शेतकरी या वाहिनीला विरोध करीत आहेत. डाकिवली परिसरातून जाणारी ही विद्युत वाहिनी रद्द करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी तक्रारीत केली आहे. या तक्रारीवर डाकिवली व चांबळे येथील १२३ शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या असून, जिल्हाधिकारी पालघर, महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आदींना या तक्रारींची प्रत देण्यात आली आहे.
महापारेषण कंपनीने पूर्वी खदानलगतच्या जागेत केलेले सर्वेक्षण रद्द करून आता पूर्ण डाकिवली गावाला वळसा घालून अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या जागेतून ही वाहिनी नेत असून अनेक शेतकऱ्यांवर अन्याय
करत आहेत. या वाहिनीमुळे आम्हा शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे.
-विठ्ठल घरत,
बाधित शेतकरी