‘शेतकऱ्यांनी भूमातेची विक्री करू नये’
By admin | Published: February 2, 2016 01:45 AM2016-02-02T01:45:05+5:302016-02-02T01:45:05+5:30
भारताची अर्थव्यवस्था कृषिप्रधान आहे़ शेती हेच ग्रामीण अर्थव्यवस्थेचे साधन आहे़ भविष्यात शेतीला चांगले दिवस येतीलच, त्यामुळे परवडत नाही
तलवाडा : भारताची अर्थव्यवस्था कृषिप्रधान आहे़ शेती हेच ग्रामीण अर्थव्यवस्थेचे साधन आहे़ भविष्यात शेतीला चांगले दिवस येतीलच, त्यामुळे परवडत नाही, या नावाखाली सुरू असलेली शेतीची विक्री शेतकऱ्यांनी थांबवावी, असे आवाहन कुणबीसेनाप्रमुख विश्वनाथ पाटील यांनी शेतकऱ्यांशी हितगुज साधताना विक्रमगड येथे केले़
गेल्या दोनचार वर्षांपासून वारंवार भातशेतीत शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागत आहे़ निसर्गाच्या लहरीपणाने शेतकरी हताश झाला आहे़ पण, याचा सामना करावयास हवा़ शेतीचे उत्पन्न वाढविण्यासाठी पारंपरिक पद्धतीत बदल करून नवनवीन शेती उत्पादनाचे प्रयोग शेतीतून शेतकऱ्यांनी करावेत, असे नमूद करत वडिलोपार्जित शेती म्हणजे कुटुंबाच्या भविष्याची तरतूद आहे़ क्षणिक पैशांच्या मोहाला बळी पडून आपल्या हक्काच्या शेतीचा सातबारा दुसऱ्यांच्या नावावर करणे, हे चुकीचे आहे़ शेतकऱ्यांनी फलोद्यान तसेच फुलशेतीच्या पिकांचे उत्पन्न काढून नगदी पिके, बागायती उत्पन्न घेऊन आपल्या कृषी व्यवसायाला नवी संजीवनी देण्याची गरज आहे़ शेतीची विक्री म्हणजे शेती व्यवसायाचा गळा घोटण्याचा प्रकार आहे़ शासनाच्या नवनवीन योजनांचा फायदा घेऊन हंगामी पीक वारंवार घेणे व उत्पन्न वाढविणे, ही काळाची गरज असल्याचे विश्वनाथ पाटील यांनी या वेळी सांगितले़