भात खरेदी केंद्राअभावी शेतकरी त्रस्त; कमी दरात व्यापाऱ्यांना भात विकण्याची वेळ
By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2019 12:05 AM2019-12-14T00:05:21+5:302019-12-14T00:05:57+5:30
आर्थिककोंडीमुळे भूमिपुत्र हैराण
पारोळ : आधीच अस्मानी संकटाने पूर्ण कोलमडून गेलेल्या शेतकऱ्यांना आता सरकारी छळवणुकीला सामोरे जावे लागत आहे. डिसेंबर महिना उजाडला तरी वसईत अद्याप भात खरेदी केंद्र सुरू करण्यात आलेले नसल्याने शेतकरीवर्गाची मोठी आर्थिक कोंडी झाली आहे. या वर्षी परतीच्या पावसाने शेतकरीवर्गाचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसान भरपाईची मदतही तुटपुंज्या स्वरूपात जाहीर झाली आहे, मात्र तीही अद्याप शेतकऱ्यांच्या हाती लागलेली नाही. रब्बी पिकांच्या खर्चाचा मेळ भात पीक विकून शेतकरी बसवत असतो. पण वसईत भात खरेदी केंद्र उपलब्ध न झाल्याने व्यापाऱ्यांना कमी दरात भात विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
वसई तालुक्यातील शेतकरी पावसाळ्यात भाताचे एकमेव पीक घेतात. लहरी पावसामुळे कधी ओल्या तर कधी सुक्या दुष्काळाचा शेतकऱ्यांना सामना करावा लागतो. प्रत्यक्ष भाताचे उत्पादन, वाढलेले मजुरीचे दर आणि शासनाने जाहीर केलेली आधारभूत हमीभाव रक्कम यांचा ताळमेळ बसत नसल्याने शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागत आहे. त्यामुळे भात कसण्यास शेतकऱ्यांना परवडत नाही.
भाताचे कोठार समजल्या जाणाºया वसई पूर्व भागात खासगी व्यापाºयांची चंगळ सुरू असून शेतकºयांच्या गरजेचा फायदा घेऊन हे व्यापारी कवडीमोलाने भात खरेदी करत आहेत. वसई तालुक्यात पहिले भात खरेदी केंद्र शिरवली येथील सेवा सोसायटीच्या गोदामात सुरू झाले. नंतर ते भिनार व मेढे येथे हलवले. या वर्षीही वसई तालुक्यात दोन भात खरेदी केंद्रे मंजूर असताना अजूनही ती सुरू झाली नसल्याने शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे, तर शिरवली हे ठिकाण या केंद्रासाठी योग्य असल्याने या ठिकाणी भात खरेदी केंद्र सुरू करावे, अशी मागणी शेतकरी करत आहेत.
भात खरेदी केंद्र सुरू न झाल्याने शेतकऱ्यांना १२०० ते १३०० रु. क्विंटल दराने भात पीक खाजगी व्यापारी यांना विकावे लागत आहे, तर या वर्षी भात खरेदी केंद्राचा १७५० हमी भाव असून २०० रुपये महाराष्ट्र शासनाचा बोनस आहे. यामुळे वसईत भात खरेदी केंद्र सुरू न झाल्याने शेतकºयांचे मोठे नुकसान होत आहे.
- रमेश घरत, अध्यक्ष, शिरवली सेवा सोसायटी