हमी भाव नसल्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2018 01:57 AM2018-03-26T01:57:17+5:302018-03-26T01:57:17+5:30

आघाडी सरकारच्या काळात शेतकरी पिकवीत असलेले तांदूळ, गहू, कापूस आदींच्या निर्यातीबाबत देश एक नंबरवर होता

Farmers suicides due to lack of guarantee | हमी भाव नसल्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्या

हमी भाव नसल्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्या

Next

हितेन नाईक 
पालघर : आघाडी सरकारच्या काळात शेतकरी पिकवीत असलेले तांदूळ, गहू, कापूस आदींच्या निर्यातीबाबत देश एक नंबरवर होता. त्यांच्या उत्पादनाला आता हमीभाव ही मिळत नसल्याने तो आत्महत्या करीत आहे. तर दुसरीकडे अर्थव्यवस्था संकटात गेल्याने उद्योगधंदे बंद पडून लाखो तरुण बेरोजगार होत असल्यामुळे विकासाच्या नावाखाली निवडून आलेल्या भाजपा सरकारने जनतेची घोर फसवणूक केल्याची टीका माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी पालघरमध्ये आयोजित कार्यकर्त्या मेळाव्यात केली.
पालघर (अल्याळी) येथील बंधन रिसॉर्ट येथे शनिवारी कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी डहाणू, जव्हार, विक्रमगड, पालघर आदी भागातील शेकडो कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. यावेळी माजी मंत्री गणेश नाईक, जितेंद्र आव्हाड, प्रदेशच्या महिला अध्यक्षा चित्रा वाघ, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव, आ.आनंदभाई ठाकूर, निरीक्षक संजय वढावकर,जिल्हाध्यक्ष सुनील भुसारा,तालुकाध्यक्ष सुभाष पाटील, जिल्हा सरचिटणीस अनिल गावड, कामगार नेते संजय पाटील, महिला जिल्हाध्यक्ष निलम राऊत, शहर अध्यक्ष विरेंन्द्र पाटील, नगरसेवक प्रीतम राऊत, आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्र माचे प्रास्ताविक करतानाच भूलथापांना बळी पडून भाजप मध्ये गेलेले अनेक कार्यकर्ते आपल्या पक्षात प्रवेश घेत असून पुढे या भागात आपलाच आमदार निवडून येण्याची हमी जिल्हाध्यक्ष भुसारा यांनी दिली. जिल्हानिर्मिती नंतर आम्हाला सुगीचे दिवस येतील या आमच्या अपेक्षांचा भंग झाला असून बुलेट ट्रेन, सहापदरी मार्ग, रेतीवरील बंदी,सूर्याचे पळविलेले पाणी आदी कारणाने आमचे शेतकरी,तर पर्ससीन नेट,हद्दीचा वाद आदी कारणाने आमचा मच्छीमार उद्ध्वस्त होत असल्याचे वास्तव तालुकाध्यक्ष सुभाष पाटील ह्यांनी सर्वांसमोर मांडले.
कुपोषणाची दाहकता जराशीही कमी झाल्याचे दिसून येत नसून मागील १७ महिन्यात २४ हजार ७१८ बालकांचा कुपोषणाने मृत्यू झाला असून आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा ह्यांच्या मतदार संघात ७ हजार ३२० बालमृत्यू झाले असून ३ हजार ५०० कुपोषित बालके असल्याचे महिलाध्यक्षा वाघ यांनी सांगितले. कुपोषणाने बालके मरत असतील तर मरू देत असे असंवेदनशील वक्तव्य करणाºया आदिवासी मंत्र्यांना भूकबळी गेलेल्याच्या कुटुंबीयांनी हाकलून लावले होते. कुपोषण मुक्तीचा नारा देणाºया या सरकारने कुपोषण मुक्तीत महत्वपूर्ण योगदान देणाºया अंगणवाडी सेविकांची पोषण आहाराच्या सामग्रीची बिले दिली नाहीत, त्यांना मानधन, भाऊबीज दिली जात नाहीत, अब्दुल कलाम आहार योजना बंद केली आणि उलट त्यांना जुलमी असा मेस्मा लावण्याचे काम या सरकार कडून केले जात आहे, असा आरोप केला.
आज मोठ्या प्रमाणात महिलांवरील अत्याचाराचे सत्र सुरू असून पोलिसांनी दिलेल्या अहवालावरून दररोज १२ महिलांवर बलात्कार होत असून ३६ महिलांची छेड तर ३० मुलींचे अपहरण केले जाते.त्यामुळे उच्च न्यायालयाने ह्या सरकारवर ताशेरे ओढले असून हे सरकार जेवढ्या तत्परतेने ‘गाई’ची काळजी घेते तेवढ्या तत्परतेने ‘ताई’ ची काळजी घेत नसल्याची आगपाखड महिला प्रदेशाध्यक्षा वाघ यांनी भाजप सरकारवर करून लोकांच्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले. पालघर नगरपरिषदेची हातातून थोडक्यात गेलेली सत्ता ह्यावेळी नक्कीच मिळवू, असा दावा करून एकत्रित लढण्याचा सल्ला माजी मंत्री डॉ. आव्हाड यांनी दिला. मंत्रालयातील उंदिर घोटाळ्यावर टीका करतांना विरोधकांनी चिक्की घोटाळा आदी घोटाळ्याबाबत आवाज उठविल्याने त्याची फाईल उंदरानी कुरतडली असावी अशी खवचट टीका वक्त्यांनी केली. धर्मा पाटलासारख्या एका शेतकºयाला त्याच्या जमिनीचा योग्य मोबदला हे सरकार देऊ शकत नसेल तर नुसतेच आश्वासनाचे गाजर दाखिवणाºया ह्या सरकारने आपले कमळ हे चिन्ह बदलून ते गाजर ठेवावे अशी टीका आव्हाडांनी केली.

भाजप सरकारला आपले अधिकार आणि कर्तव्य ह्याची जाणीव राहिली नसून २ कोटी लोकांना रोजगार, १५ लाख बँकेत ठेवण्याचे आश्वासन देणाºया सरकारच्या धोरणामुळे एमआयडीसी मधील कारखाने बंद पडत असून १ कोटी बेरोजगार झाल्याचे माजी मंत्री गणेश नाईक ह्यांनी सांगितले. मोदींच्या घोषणेवर विश्वास ठेवल्याने माझ्यावर एक कंपनी विकण्याची नामुष्की ओढवल्याची कहाणी घेऊन एक स्थानिक उद्योगपती माझ्याकडे आल्याची माहिती नाईक यांनी देऊन ज्या गतीने हे सरकार सत्तेवर आलंय त्याच गतीने खाली येणार असल्याचे शेवटी त्यांनी सांगितले.
पालघर जिल्ह्यात राष्ट्रवादी पक्ष वाढविण्यासह अन्य कामात लक्ष घालण्याच्या सूचना शरद पवारांनी कामगार नेते संजय पाटील यांना केल्या आहेत.

Web Title: Farmers suicides due to lack of guarantee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.