मुंबई-बडोदा महामार्गाचे काम बंद पाडण्याचा शेतकऱ्यांचा इशारा; शेतात पाणी साचले
By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2023 07:28 AM2023-07-02T07:28:07+5:302023-07-02T07:28:20+5:30
‘लोकमत’मधील वृत्तानंतर कंपनीकडून पाहणी
सफाळे : पालघर तालुक्यातील सफाळे पूर्व भागातील मुंबई- बडोदा एक्स्प्रेस वेच्या कामामुळे नैसर्गिक नाले बंद झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पेरलेले भात बियाणे कुजण्याची भीती असून दुबार पेरणी करण्याचे संकट शेतकऱ्यांवर ओढवले आहे. ‘लोकमत’मध्ये यासंदर्भातील बातमी प्रकाशित होताच शनिवारी एक्स्प्रेस वेचे काम करीत असलेल्या जीआर इन्फ्रा कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर यांनी शेतकऱ्यांबरोबर चर्चा केली. दोन दिवसांत शेतातील पाण्याचा निचरा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. मात्र, गिराळे- नगावे गावातील शेतकरी आक्रमक झाले असून काम बंद करण्याचा इशारा दिला आहे.
पालघर तालुक्यातील १८० हेक्टर जमीन ही मुंबई- बडोदा एक्स्प्रेस वेच्या कामासाठी संपादित केली असून १५ ते २० फूट उंच भराव टाकण्यात आला आहे. मात्र, या एक्स्प्रेस वेच्या दोन्ही बाजूंनी शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात शेती आहे. या कंपनीमार्फत नैसर्गिक नाले बंद करून पाणी जाणाऱ्या मार्गात बदल केला आहे. त्यामुळे चार-पाच दिवसांपासून पाणी शेतातच साचले आहे. मुंबई- बडोदा एक्स्प्रेस वेच्या जीआर इन्फ्रा कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर अरविंद श्रीवास्तव, डेप्युटी प्रोजेक्ट मॅनेजर ललित जोशी, प्रवीण भिंगारे यांनी शनिवारी गिराळे येथे जाऊन शेतकऱ्यांबरोबर चर्चा केली.
न्याय मिळाला नाही, तर आंदोलन
नैसर्गिक नाले बंद केल्यामुळे शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. न्याय मिळाला नाही तर आंदोलनाचा इशाराही शेतकऱ्यांनी दिला. यावेळी पंचायत समितीच्या सदस्य कामिनी पाटील व तुषार पाटील, गिराळे- नगावे येथील सरपंच मयुरी पारधी, उपसरपंच कल्याणी पाटील, सदस्य अमोल पाटील, पोलिस, केतन पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते.