फळबागायती किडीच्या विळख्यात, जिल्ह्यातील शेतकरी चिंताग्रस्त

By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2020 01:46 AM2020-01-08T01:46:10+5:302020-01-08T01:46:18+5:30

चिकू, नारळ, आंबा तसेच केळी, पेरू, सफेद जांबू यांवर स्पायरेलींग व्हाईट फ्लायचा प्रादुर्भाव वाढल्याने आगामी काळात फळगळ होऊन उत्पादन घटण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

Farmers worried about the orchards, the farmers in the district | फळबागायती किडीच्या विळख्यात, जिल्ह्यातील शेतकरी चिंताग्रस्त

फळबागायती किडीच्या विळख्यात, जिल्ह्यातील शेतकरी चिंताग्रस्त

Next

अनिरूद्ध पाटील 
बोर्डी : जिल्ह्यातील प्रमुख फळबागायतीतील चिकू, नारळ, आंबा तसेच केळी, पेरू, सफेद जांबू यांवर स्पायरेलींग व्हाईट फ्लायचा प्रादुर्भाव वाढल्याने आगामी काळात फळगळ होऊन उत्पादन घटण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, तत्काळ उपाययोजना सुचविण्याची मागणी होत असून याबाबत कोसबाड कृषी विज्ञान केंद्राकडून शेतकरी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
अतिवृष्टी, पावसाचा वाढलेला कालावधी, अवकाळी पाऊस आणि या काळात हवेतील आद्रतेचे प्रमाण वाढल्याने जिल्ह्यातील फळबागायतीत विविध रोगांमुळे झाडांची रोगप्रतिकारक शक्ती कमी झाली आहे. येथे चिकू, नारळ, आंबा, सफेद जांबू, केळी, पेरू या फळ पिकांची लागवड आठही तालुक्यात असून त्यांच्या पानांवर स्पार्कल व्हाईट फ्लायचा प्रादुर्भाव दिसतो आहे. नारळ आणि केळी पिकावरील ही वाढ चिंताजनक आहे. पानांच्या खालच्या भागात राहून पानातील अन्नरस शोषून घेतल्याने ती पिवळी होऊन खाली पडतात. त्यामुळे फळांचा आकार लहान होण्यासह फळगळतीचा धोका उद्भवू शकतो. तसे झाल्यास उत्पादनात घट होऊन मोठ्या आर्थिक नुकसानीची शक्यता आहे. यासाठी डहाणू तालुक्यातील नरपड गावचे प्रगतीशील शेतकरी देवेंद्र राऊत यांनी मार्गदर्शनाची गरज व्यक्त केली आहे.
दरम्यान, कोसबाड कृषी विज्ञान केंद्रात याबाबत शेतकरी मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले असून आगामी काळात विविध गावांमध्ये हे प्रशिक्षण शिबिर घेण्यात येणार आहे. जिल्ह्यात नव्याने आढळलेल्या या स्पायरेलींग व्हाईट फ्लाय या किडीच्या नियंत्रणासाठी शेतकऱ्यांनी बागेमध्ये लेडी बर्ड बिटल, क्र ायसोपा अशा मित्र किडींचं संवर्धन करावे. झाडांवर बुरशीची वाढ होऊन काळपट झाल्यास कपडे धुण्याच्या पावडरीचे ५ टक्के द्रावण किंवा २ ग्रॅम स्टार्च प्रती लिटर पाण्यात टाकून फवारणी करावी. निंबोळी तेल किंवा करंज तेल २.५ टक्के किंवा निंबोळी बियांचा अर्क५ टक्के यापैकी कोणतीही फवारणी करता येऊ शकते. जैविक किटकनाशकापैकी लिकॅनिसिलीयम लिकॅनी या बुरशीची ५ ग्रॅम प्रती लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करण्यासह, तीव्र प्रादुर्भाव झाल्यास लॅमडा सायलोथ्रीन ५ टक्के प्रवाही १ मिलि प्रती लिटर पाणी, प्रोफेनॉस, इमिडाक्लोप्रीड.०.५ मिलि प्रती लीटर पाणी, सायपरमेथ्रीन यापैकी कोणतेही एक कीटकनाशक पानाच्या खालील बाजूस फवारणी आवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. तर नारळासोबत आता अन्य होर्टिकल्चर पिके आणि वृक्षांवर तसेच शोभेच्या झाडांवरही याचा प्रादुर्भाव वाढत आहे.
>किडीसंबंधी नियोजन आवश्यक
सर्व पिकांवर आणि सर्व भागात ही कीड पसरली आहे. या किडीसंबंधी माहिती जाणून घेण्यासह नियोजन गरजेचे आहे.
या किडीचे व्यवस्थापन एका किटकनाशकाने होणे कठीण आहे. जोपर्यंत नैसर्गिक मित्र किटकांची संख्या वाढत नाही, तोवर केवळ किटकनाशक फवारून नियंत्रण करणे अवघड आहे. याकरिता जैविक पद्धतीचा अवलंब करावा असे आवाहन कोसबाड कृषी विज्ञान केंद्राचे किटकशास्त्रज्ञ उत्तम सहाणे यांनी केले आहे.
>शेतकºयांनी सामूहिक पद्धतीने या किडीचे नियंत्रण करावे. यासाठी जिल्ह्यातील सर्व कृषि संबंधित यंत्रणांनी योग्य समन्वय ठेऊन कीड नियंत्रणासाठी व्यापक जनजागृती अभियान राबविल्यास किडीचे जलद गतीने नियंत्रण होईल.
-प्रा. विलास जाधव
(प्रमुख शास्त्रज्ञ,
कोसबाड कृषी विज्ञान केंद्र, डहाणू)
जिल्ह्यातील सर्वच बागायतीवर या किडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळे पाने आणि फळगळती होऊन उत्पादनात घट होऊन आर्थिक फटका बसू शकतो. याकरिता मार्गदर्शन आवश्यक आहे.
- देवेंद्र गोविंद राऊत (शेतीनिष्ठ शेतकरी,नरपड, डहाणू )

Web Title: Farmers worried about the orchards, the farmers in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.