परतीच्या पावसाने पेंढ्यांचे भाव घसरल्याने शेतकरी चिंताग्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2020 11:51 PM2020-11-29T23:51:17+5:302020-11-29T23:51:28+5:30

विक्रमगड तालुक्यात अनेक वर्षांपासून गवत- खरेदीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जात आहे.

Farmers worried over fall in straw prices due to return rains | परतीच्या पावसाने पेंढ्यांचे भाव घसरल्याने शेतकरी चिंताग्रस्त

परतीच्या पावसाने पेंढ्यांचे भाव घसरल्याने शेतकरी चिंताग्रस्त

Next

विक्रमगड : तालुक्यात भातशेतीबरोबरच माळरानात शेतामध्ये गवतही मोठ्या प्रमाणात उगवते. शेतकरी, शेतमजूर हे गवत व त्याचबरोबर भातझोडपणी करून राहत असलेल्या पेंढ्यांची (पाओलीची) विक्री करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत असतात. विक्रमगड तालुका हा गवत-पेंढा खरेदी करण्याचे कोठार समजले जाते. या गवत पाओलीच्या वखारी तालुक्यात नोव्हेंबरअखेरीस काही भागात सुरू झाल्या असून त्याला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी मात्र नाराज झाले आहेत. पाओलीला व गवताला योग्य भाव देण्याची मागणी शेतक-यांकडून केली जाऊ लागली आहे. या वर्षी उशिराने नोव्हेंबरशेवटी वखारी सुरू झाल्याने गवत पाओली खरेदीविक्रीला जोर आला असला, तरी तालुक्यात गवताला पाच हजार रुपये टन भाव देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

विक्रमगड तालुक्यात अनेक वर्षांपासून गवत- खरेदीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जात आहे. वाडा, जव्हार, पालघर, डहाणू तालुक्यांतून मोठ्या प्रमाणात शेतकरी गवत पाओली विकण्यासाठी विक्रमगड तालुक्यातील वखारीत आणतात. गेल्या वर्षी तालुक्यात गवत व पाओली खरेदीच्या २५ वखारी सुरू होत्या. यावर्षी त्याची संख्या कमी होऊन सातआठ वखारी सुरू आहेत. या वखारीतील गवताला योग्य भाव नसल्याने वखारीमालक गवत वखारीत साठवणूक करून ठेवत असतात. पावसाळ्यात गवताच्या गठड्यांना मोठी मागणी व योग्य भाव असल्याने वखारीमालक दूध व्यवसाय करणाऱ्या तबेल्यांना विक्री करतात. यावर्षी पावसाळ्यादरम्यान वखारी बंद होत्या. त्यामुळे आम्हाला तोट्यात जावे लागले, असे वखारमालकांचे म्हणणे आहे. यापूर्वी आदिवासी विकास महामंडळाने गवत-पाओलीला एकाधिकारी खरेदी केली होती, परंतु त्यांना योग्य प्रतिसाद न मिळाल्याने ही खरेदी केंद्रे बंद करण्यात आली आहे. आता खाजगी व्यापारी हा व्यवसाय करीत आहेत.

इतर तालुक्यांच्या तुलनेत कमी भाव
विक्रमगडमध्ये सद्य:स्थितीत व्यापारी शेतकऱ्यांना पाओलीला २२०० ते २५०० रुपये टन भाव देत असून गेल्या वर्षी पाओलीला टनाला ३५०० ते ४००० हजार भाव मिळत होता. या वर्षी पाऊस लांबल्याने व परतीच्या पावसाने पाओली कुजल्याने भाव घसरला असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. इतर तालुक्यांतील काही भागात पाओलीला टनाला ३००० ते ३२०० रुपये टन भाव दिला जात आहे. मात्र, विक्रमगड तालुक्यात टनाला २२०० ते २५०० रुपये भाव देत असल्याने तालुक्यातील शेतकरी नाराज झाले आहेत.

वाढती महागाई तसेच शेती अवजारे, खते, बियाणे यांचे भाव, मजुरांची मजुरी वाढली आहे. भातालाही योग्य भाव नसल्याने पाओलीला साधारण ४००० रु. टन भाव व्यापारीवर्गाने द्यावा. -ज्ञानेश्वर जाधव, शेतकरी, विक्रमगड

यावर्षी परतीचा पाऊस ऑक्टोबरपर्यंत लांबला. त्यामुळे शेतीचे नुकसान केले. पाओली खरेदी करणा-या व्यापारीवर्गाने सहानुभूतीपूर्वक विचार करून पाओलीला भाव वाढवून द्यावा. -प्रमोद पाटील, सामाजिक कार्यकर्ता

Web Title: Farmers worried over fall in straw prices due to return rains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी