जिप्सन विरोधात दुसऱ्या दिवशीही उपोषण सुरूच
By admin | Published: December 10, 2015 01:44 AM2015-12-10T01:44:54+5:302015-12-10T01:44:54+5:30
वाडा तालुक्यातील वडवली व नारे या ग्रामपंचायतीच्या हद्दीत असलेल्या जिप्सन ही कंपनी विविध ठेके हे स्थानिकांना न देता परप्रांतीयांना देत असल्याने व त्यामुळे स्थानिकांना
वाडा : वाडा तालुक्यातील वडवली व नारे या ग्रामपंचायतीच्या हद्दीत असलेल्या जिप्सन ही कंपनी विविध ठेके हे स्थानिकांना न देता परप्रांतीयांना देत असल्याने व त्यामुळे स्थानिकांना रोजगार मिळत नसल्याने येथील ग्रामस्थांनी कंपनीच्या प्रवेश द्वारासमोर सोमवार पासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे. मात्र त्याची दखल प्रशासनाने न घेतल्याने उपोषण दुसऱ्या दिवशीही सुरूच राहिले.
वडवली व नारे या ग्रामपंचायतीच्या हद्दीत जिप्सन ही कंपनी असून या कंपनीत पीओपी सिट व पावडर यांचे उत्पादन केले जाते. या कंपनीत वाहतूक व्यवस्था, ट्रॅव्हल्स, मजूर कामगार ठेका, फॅब्रीकेशन, रंग काम आदी विविध प्रकारचे ठेके हे स्थानिक ग्रामस्थांना न देता परप्रांतीयांना दिले जातात त्यामुळे या गावातील तरूणांना रोजगार मिळत नाही.
या कंपनीतील सर्व ठेके हे ग्रामस्थांनाच द्यावेत या मागणीसाठी येथील ग्रामस्थ उपोषणास बसले आहेत. मात्र कंपनी प्रशासनाने या आंदोलनाची दखल न घेतल्याने उपोषण सुरूचआहे. न्याय मिळेपर्यंत उपोषण सुरूच राहील असा निर्धार उपोषणकर्त्यांनी केला आहे. या उपोषणाला कॉग्रेसचे नेते मुस्तफा मेमन यांनी भेट देऊन पाठिंबा दर्शविला आहे. कंपनी प्रशासनाने या आंदोलनाची तत्काळ दखल न घेतल्यास आंदोलन तीव्र करण्यात येईल असा गंभीर इशारा मेमन यांनी प्रशासनाला दिला आहे. दरम्यान, कॉग्रेसचे नेते रामदास जाधव, इरफान सुसे, भाजपाचे भगवान चौधरी, आरपीआयचे डी. जी. भोईर, रमेश भोईर यांनी भेटी देऊन उपोषणाला पाठिंबा दर्शविला आहे. (वार्ताहर)