कारवाई करताना वसई मनपाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर जीवघेणा हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2021 01:05 AM2021-01-29T01:05:26+5:302021-01-29T01:06:50+5:30
कंपनी मालकासह कर्मचाऱ्यांची गुंडगिरी : आरोपींविरोधात गुन्हा
नालासोपारा : वसई फाटा येथील एका कंपनीचे रस्त्यावरील अनधिकृत बांधकाम निष्कासित करण्यासाठी गेलेल्या महानगरपालिकेच्या ‘जी’ प्रभागाच्या साहाय्यक आयुक्तांसह कर्मचाऱ्यांवर दगड, लाठ्याकाठ्या घेऊन जीवघेणा हल्ला करीत कंपनी मालकासह कर्मचाऱ्यांनी गुंडागर्दी केल्याची धक्कादायक घटना बुधवारी दुपारी घडली. कंपनीच्या गुंडांनी जेसीबी चालकाचे डोके फोडून जेसीबीचीही नासधूस केली आहे. या प्रकरणी सहायक आयुक्तांनी वालीव पोलीस ठाण्यात तक्रार देऊन आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
वसई-विरार शहर महापालिकेच्या प्रभाग समिती ‘जी’ अंतर्गत येणाऱ्या सर्व्हे नंबर ६२ च्या प्लॉट नंबर ३ व प्लॉट नंबर ४ समोरील रस्त्यावर अतिक्रमण केलेले बांधकाम निष्कासित करण्यासाठी साहाय्यक आयुक्त राजेंद्र कदम, अतिक्रमण विभागाचे इंजिनीअर कौस्तुभ तामोरे, मनपाचे कर्मचारी जितेंद्र जाधव, सुशांत किणी, विद्याधर पाटील, तुषार पाटील, हरिहर पाटील, हितेश भोईर, रोहित भोईर, अलंकार रिजाई, जागृत किणी, केतन पाटील व यांच्यासोबत एक जेसीबी आणि त्याचा चालक रमजान अली अब्दुल खान हे सर्व बुधवारी दुपारी ३ वाजता इन्टरटेक टेक्नॉलॉजीस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या गेटसमोर पोहोचले.
आरोपी अरुण कमलाप्रसाद मिश्रा, नीरज शेषणाथ पासवान, पुष्पराज राजेश्वरी सिंग, सागर सुनील चव्हाण, सुबोध इंद्रसेन नागेन व त्यांच्या पाच ते सात साथीदारांनी हातात लाकडी दांडके, लोखंडी रॉड घेऊन कामात अटकाव करून सरकारी कामात अडथळा निर्माण केला. दरम्यान, साहाय्यक आयुक्तांना शिवीगाळ करीत धक्काबुक्की करून जेसीबीचालक रमजान अली अब्दुल खान याच्या डोक्यात दगड मारून त्याला गंभीर जखमी केले. आरोपींनी जेसीबीवर लाठ्याकाठ्या व लोखंडी रॉडने काचा फोडून तिचे मोठे नुकसान केले.
वरिष्ष्ठांच्या आदेशानुसार अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यासाठी मनपा कर्मचाऱ्यांसह गेलो होतो. कंपनीच्या मालकासह कर्मचाऱ्यांनी गुंडागर्दी करून जेसीबी चालकाचे डोके फोडले आहे. - राजेंद्र कदम, साहाय्यक आयुक्त, जी प्रभाग, वसई
या प्रकरणी ८ आरोपींना अटक केली असून त्यांना न्यायालयात हजर केल्यावर दोन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आली आहे.
- विलास चौगुले, वपोनि, वालीव पोलीस ठाणे.