धक्कादायक! एक सेल्फी जीवावर बेतला अन् बाप-लेक समुद्राच्या पाण्यात बुडाले
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2023 08:09 PM2023-08-28T20:09:11+5:302023-08-28T20:11:17+5:30
सेल्फीमुळे पिता पुत्र समुद्रात बुडाले, वसईच्या समुद्रकिनारी घडली घटना
मंगेश कराळे
नालासोपारा :- वसई किल्ला येथील समुद्रकिनारी रविवारी संध्याकाळी सेल्फी काढण्याच्या प्रयत्नात १४ वर्षीय मुलगा पाण्यात पडला. मुलाला वाचविण्यासाठी गेलेले वडीलही समुद्राच्या पाण्यात बुडाले. वसई पोलिसांना माहिती मिळाल्यावर घटनास्थळी जाऊन बुडालेल्या पिता-पुत्रांचा शोध सुरू केला आहे.
वसईच्या ओम नगर येथे राहणारे शैलेंद्र मोरे (४२) हे आई आणि मुलगा देवेंद्र (१४) याच्यासोबत राहत होते. रविवारी त्यांनी घरी स्वामी समर्थांचा पाठ आयोजित केला होता. पूजा संपल्यावर निर्माल्य समुद्रात टाकण्यासाठी शैलेंद्र मोरे मुलाला घेऊन दुचाकीने वसई किल्ल्याजवळ गेेले होते. निर्माल्य टाकल्यानंतर देवेंद्र जेटीवरून सेल्फी काढत होता. त्यावेळी त्याचा तोल गेल्याने तो पाण्यात पडला. त्याला वाचविण्यासाठी धावत त्याच्या वडिलांनी पाण्यात उडी मारली व ते देखील बुडाले. एका प्रत्यक्षदर्शीने हा प्रकार पाहिला आणि वसई पोलिसांना कळवले.
दरम्यान, तिथे असलेल्या दुचाकीवरून सोमवारी दुपारी पोलिसांनी शैलेंद्र मोरे यांचे कुटुंबियांशी संपर्क साधला. वसई पोलिसांचे पथक समुद्रात बेपत्ता पिता-पुत्रांचा शोध घेत आहे. सेल्फी काढण्याच्या प्रयत्नात ही दुर्घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. आमचे पथक बोटीने सर्व समुद्रकिनार्यावर पिता पुत्राचा शोध घेत असल्याचे वसईचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजीत आंधळे यांनी सांगितले.