वसईत दरड कोसळून बाप-लेकीचा मृत्यू, दोघांना वाचवण्यात यश
By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2022 07:00 AM2022-07-14T07:00:17+5:302022-07-14T07:01:07+5:30
सरकारकडून मृतांच्या वारसांना प्रत्येकी ६ लाखांची मदत
नालासोपारा : वसईच्या राजावली परिसरातील वाघराळपाडा येथे बुधवारी सकाळी दरड कोसळून बाप-लेकीचा मृत्यू झाला असून दोन जणांना वाचविण्यात यश आले आहे. स्थानिक पोलीस व वसई-विरार महापालिका अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. दरम्यान, दोन जणांना वाचवण्यात यश आले आहे.
वालीव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राजीवली गावातील वाघराळपाडा भागात बुधवारी दरड कोसळण्याची घटना घडली. या दरडीखाली एकाच घरातील चार जण अकडले होते. त्यातील अमित ठाकूर (३५) व रोशनी ठाकूर (१४) हे दोघे बाप-लेकीचा ढिगाऱ्याखाली अडकून मृत्यू झाला आहे, तर वंदना अमित ठाकूर (३३) व ओम अमित ठाकूर (१०) या आई व मुलाला वाचवण्यात यश आले आहे.
वसईच्या राजावली येथील वाघराळपाड्यात बुधवारी सकाळी घडलेल्या घटनेतील अमित ठाकूर व रोशनी ठाकूर या दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी जवळच्या रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत. या दोघांचा मृत्यू झाल्याचे पालघर जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयातून सांगण्यात आले आहे. घटनास्थळी पोलीस आयुक्त डॉ. सदानंद दाते, पोलीस उपायुक्त संजयकुमार पाटील यांनी भेट देऊन माहिती घेतली आहे.
राजीवली परिसरात वाघराळपाडा परिसरात मोठ्या प्रमाणावर बैठ्या चाळींचे अनधिकृत बांधकाम करण्यात आलेले आहे. दाटीवाटीने चाळी बांधण्यात आल्यामुळे घटनास्थळी मदतकार्य वेळेत पोहोचू शकले नाही. वनविभागाच्या जागेत असलेले डोंगर पोखरून येथे चाळमाफीयांनी अनधिकृत बांधकामे केली असून त्याला स्थानिक प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.