वडिलांचे भांडण बेतले मुलाच्या जीवावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2019 11:47 PM2019-12-30T23:47:02+5:302019-12-30T23:47:10+5:30

चार वर्षांच्या चिमुरड्याचे अपहरण आणि खून; भाड्याचे पैसे न दिल्याने जाब विचारल्याचा राग

Father's dispute over a boy's life | वडिलांचे भांडण बेतले मुलाच्या जीवावर

वडिलांचे भांडण बेतले मुलाच्या जीवावर

Next

नालासोपारा : आरोपीला घरात आश्रय देऊन त्याच्या राहण्याची व खाण्या-पिण्याची सोय करणाऱ्या परिवाराला एक वेगळाच परिणाम भोगावा लागला. आरोपीने खाण्याचे व राहण्याचे पैसे दिले नाहीत म्हणून त्याला घराबाहेर काढल्यानंतर त्याच्या घराच्या बाजूलाच घर भाड्याने घेऊन राहात वडिलांसोबत दोन-तीन वेळा भांडण करून त्यांना धडा शिकवण्यासाठी दुसºया एका आरोपीसोबत कट रचून चार वर्षांच्या मुलाचे अपहरण करून त्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना वालीव पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली होती. या हत्येच्या गुन्ह्याचा छडा लागण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास चौगुले यांनी दोन वेगवेगळी दोन पथके नेमून शिताफीने गुन्ह्याचा तपास करून दोन्ही आरोपींना अटक केली.

वसई पूर्वेकडील रिचर्ड कंपाऊंडमधील यादव डेरी जवळील कैलाश चाळीत ताजेश्वरकुमार हिरालाल गौतम (२७) हे आपल्या परिवारासह राहतात. त्यांनी आरोपी जंगीलाल नंदलाल हरिजन (२३) याला आपल्या घरात राहण्याची व खाण्याची सोय करून पेर्इंगगेस्ट म्हणून ठेवले होते. पण त्याने २ ते ३ महिन्याचे खानावळ आणि राहण्याच्या भाड्याचे पैसे दिले नाही म्हणून जाब विचारला. या वेळी झालेल्या भांडणानंतर त्याला घराबाहेर काढण्यात आले होते. जंगीलाल यानंतर त्याच चाळीत राहणारा व ओळखीचा दुसरा आरोपी इम्रान याच्या घरी राहायला गेला. त्याचे त्यानंतर २-३ वेळा गौतम यांच्यासोबत भांडण झाले होते. घरातून काढलेला आणि भांडण केल्याचा राग मनात धरलेला आरोपी जंगीलाल याने इम्रान सोबत मिळून गौतम याला धडा शिकण्यासाठी त्याच्या मुलाच्या हत्येचा कट आखला. गौतम यांचा चार वर्षांचा मुलगा शैलेश गौतम हा २ डिसेंबर रोजी दुपारी घराबाहेर खेळत होता. पण तो घरी परतलाच नसल्याने आजूबाजूला व सर्वत्र त्याचा शोध घेतला गेला, पण तो सापडलाच नाही. त्याला कुणीतरी फूस लावून किंवा कोणते तरी आमिष दाखवून पळवून नेल्याची तक्रार घरच्यांनी दुसºया दिवशी वालीव पोलीस ठाण्यात दिली होती. पोलिसांनी मुलाचा फोटो आणि माहिती व्हॉट्सअप या सोशल मीडियावर आणि पत्रकारांना वर्तमानपत्रात प्रसारित करण्यासाठी देऊन सगळीकडे जोरदार तपासाची चक्रे सुरू केली. पण ५ डिसेंबर रोजी संध्याकाळी अंदाजे पाच वाजण्याच्या सुमारास त्याच्या घरापासून ५०० मीटर अंतरावर असलेल्या पडक्या घरात लहान मुलाचा मृतदेह सापडल्याची माहिती वालीव पोलिसांना मिळाल्यावर घटनास्थळी पोहचले. त्या मृतदेहाची ओळख पटवून तो शैलेशचा असल्याचा घरच्यांनी स्पष्ट केले. त्याचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदन करण्यासाठी मुंबईच्या जेजे रुग्णालयात पाठवल्यानंतर हत्येचा गुन्हा पोलिसांनी दाखल केला होता.

या हत्येप्रकरणी घरच्यांनी ४-५ संशयितांची नावे पोलिसांना सांगितल्यावर जंगीलाल आणि इम्रान हे दोघे गायब झाले. पोलिसांना एका इसमावर संशय आल्यावर त्याला कंपनीतून उचलून आणत त्याची चौकशी केली असता जंगीलाल राहात असल्याचा पत्ता त्याने पोलिसांना दिला. त्याला ७ डिसेंबरला वालीव पोलिसांनी नालासोपारा पूर्वेकडील वाकनपाडा येथील राहत्या घरात धाड मारून घराची झडती घेत ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली तरी काहीही बोलण्यास तयार नव्हता. इम्रानबाबत सांग तुला सोडून देण्यात येईल असे बोलल्यावर मोबाईल नंबर दिला, पण फोन बंद होता. त्याचे लोकेशन वडाळा येथे सापडल्यावर एक टीम त्या ठिकाणी रवाना झाली. दरम्यान, नालासोपारा पश्चिमेकडील परिसरात राहत असलेल्या इम्रानच्या घरी पोलिसांची एक टीम घेऊन जंगीलाल गेला. पण तो तिथे सापडला नाही म्हणून तेथेही त्याच्या घरच्यांना पोलिसांनी विश्वासात घेऊन इम्रानचा दुसरा मोबाईल नंबर मिळवत त्याचे लिव्हिंग सर्टिफिकेटही मिळवले. दुसºया मोबाईल नंबरचे लोकेशन वडाळा येथे आल्याने तो त्याच्या मँगलोर येथील वेलूर गावी तर पळून जात नाही ना म्हणून या नावाने ट्रेनचे तिकीट बुक केले आहे का, याबाबत माहिती घेण्यासाठी रेल्वे पोलिसांची मदत घेतली. पण त्या नावाचे बुकिंग नसल्याने साधे व जनरल तिकीट काढले असावे या संशयाने दुसºया टीमला कुर्ला टर्मिनस येथून सुटणारी ट्रेन चेक करायला सांगितले. पण तो त्या ठिकाणीही सापडला नाही. नंतर छत्रपती शिवाजी टर्मिनस या ठिकाणाहून सुटणाºया गाड्या चेक केल्या, पण त्या ठिकाणी तो सापडला नसल्याने तो मुंबईतच असल्याचे स्पष्ट झाले होते.

इम्रानबाबत जोगेश्वरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलिसांना खबºयाकडून मिळाल्यावर त्या ठिकाणी टीम पोहचली. त्याच्यावर या ठिकाणी गुन्हा दाखल असल्याची माहिती मिळवली व त्याला मागे माहीम येथील दर्ग्यातून पकडले असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांच्या मेहनतीला मिळाले यश
पोलिसांनी माहीम दर्ग्याचा सगळा परिसर पिंजून काढला, पण तो सापडला नाही. यासाठी माहीम पोलिसांचीही मदत घेतली. इम्रानची आजी माहीम दर्ग्याबाहेर भीक मागते ही माहिती मिळाल्यावर तिचा शोध घेतला. पण तिच्या राहत्या घरी व आजूबाजूच्या घरात झडती घेतली असता इम्रान तेथे नव्हता. चौकशीत आजीने तो गोपुस्वामी याच्यासोबत असेल, असे सांगितले. गोपुस्वामीचा मोबाइल नंबर मिळवल्यावर तो बांद्रा येथील मट्टी येथे लोकेशन मिळाले.
सतत दोन-तीन दिवस-रात्र पोलीस तेथे त्याचा शोध घेत होते, पण पोलिसांच्या हाती निराशाच पडली. दरम्यान, माहीम दर्ग्याजवळ पोलीस थांबले असता पहाटे पाचच्या सुमारास इम्रान आला आणि पोलिसांनी त्याला जेरबंद केले. गोपुस्वामी आणि इम्रान या दोघांना वसईच्या वालीव पोलीस ठाण्यात पोलीस घेऊन आले. इम्रान याला पाहून जंगीलाल घाबरला आणि त्याने घडलेल्या संपूर्ण प्रकरणाची माहिती पोलिसांना दिली.

मुख्य आरोपी जंगीलाल नंदलाल हरिजन (२३) याने मोहम्मद इम्रान उर्फ अरमान मोहम्मद चांद शेख उर्फ बहादूर युसूफ शेख (२४) यांच्यासोबत मिळून मुलाच्या हत्येचा कट आखल्याचे कबूल केले. जंगीलाल हा शैलेश याच्या घरी राहत असल्याने त्याच्यासोबत तो खेळायचा. याचाच फायदा घेऊन ३ डिसेंबरला त्याला जंगीलालने दुपारी इम्रानच्या घरी जेवणासाठी बोलावले होते. तेथेच त्याची गळा दाबून हत्या केली. वालीव पोलीस ठाण्याचे वपोनि विजय चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. अनंत पराड, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहा. पोलीस निरीक्षक ज्ञानेश फडतरे, प्रभाकर खोत, पो.ह. मनोज मोरे, सचिन दोरकर, मुकेश पवार, राजेंद्र फड, बालाजी गायकवाड, सतीश गांगुर्डे, सागर चौगुले यांनी मेहनत घेतली.

Web Title: Father's dispute over a boy's life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Murderखून