सुशोभीकरणाच्या कामामुळे चेंगराचेंगरी हाेण्याची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 12:43 AM2021-01-14T00:43:20+5:302021-01-14T00:43:37+5:30

भाईंदर महापालिकेचा भोंगळ कारभार : प्रवाशांचे होत आहेत हाल

Fear of chaos due to beautification work | सुशोभीकरणाच्या कामामुळे चेंगराचेंगरी हाेण्याची भीती

सुशोभीकरणाच्या कामामुळे चेंगराचेंगरी हाेण्याची भीती

Next

लोकमत न्यूज नेटवर्क 
मीरा राेड : भाईंदर पश्चिमेस रेल्वे स्थानकाबाहेरील नियोजनशून्य सुशोभीकरणाच्या भोंगळ कामामुळे प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत. त्यामुळे चेंगराचेंगरीची भीती असल्याने उंच बांधलेले हे बांधकाम काढून रेल्वे स्थानकात तसेच तिकीट खिडकीकडे जाण्याचे मार्ग पूर्ववत करावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे.

या कामासाठी तब्बल आठ कोटी रुपयांचे कंत्राट महापालिकेने दिले आहे. त्यानुसार ठेकेदाराने रस्त्याच्या लेव्हलपेक्षा सुमारे चार ते पाच फूट उंचीचा पाया बांधला आहे. यामुळे रस्ता अतिशय अरुंद झाला आहे. त्यातच तिथे रिक्षा उभ्या राहत असल्याने प्रवाशांना तिकीटघराकडे जाणे जिकिरीचे झाले आहे. एमबीएमटी, एसटी, बेस्ट ह्या सार्वजनिक परिवहन बस उपक्रमासह खाजगी बस, रिक्षा, खाजगी दुचाकी व चार चाकी वाहनांनी प्रवाशांची ये-जा याच भागातून होत असल्याने वाहतूककोंडीत प्रचंड भर पडली आहे. रेल्वे स्थानकाच्या पश्चिम दिशेला मुख्य रस्त्याने जोडणारा हा उत्तरेकडचा एकमेव भाग आहे. त्यामुळे रेल्वे स्थानकातून पश्चिमेला उतरणारे दोन मुख्य जिने उत्तरेकडे आणि मध्य भागातील मोठा जिनादेखील उत्तरेकडेच उतरतो. त्यामुळे ह्या तिन्ही जिन्यांनी ये-जा करणारे हजारो प्रवासी उत्तर दिशेच्या मार्गानेच बाहेर पडतात.
मुंबई उच्च न्यायालयाने तर रेल्वे स्थानकांपासून १५० मीटर अंतरापर्यंत फेरीवालेसुद्धा बसू देऊ नका, असे आदेश दिलेले असताना सुशोभीकरणाच्या ह्या बांधकामामुळे प्रवाशांना प्रचंड अडथळा होत आहे. शिवाय फेरीवाले व दुचाकी वाहने यांचे अतिक्रमण आणखीनच जाचक ठरले आहे. त्यातच मध्ये लोखंडी खांब लावलेले असून यातून वाट काढणे जिकिरीचे होऊन वृद्ध, महिलांचीच नव्हेतर, पुरुषांचीसुद्धा दमछाक होत आहे.

सुमारे आठ कोटी रुपये खर्चून सुशोभीकरणाच्या नावाखाली नागरिकांच्या पैशांची उधळपट्टी करण्यापेक्षा येथे प्रशस्त व मोकळे मार्ग ठेवण्याची आवश्यकता आहे. रेल्वे स्थानकात पश्चिमेकडून ये-जा करण्यासाठी एकमेव मार्ग असून तोदेखील अरुंद व अतिक्रमणाच्या विळख्यात आहे. अव्यवस्था करून प्रवाशांचे हाल करण्यात महापालिका आणि नगरसेवकांना आनंद वाटतो का? हे बांधकाम काढून हा परिसर मोकळा करावा.     - दिनेश उले, प्रवासी
 

Web Title: Fear of chaos due to beautification work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.