पांढरा कांदा वसईतून हद्दपार होण्याची भीती; अवकाळी पावसाचा फटका, शेतकरी हवालदिल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2022 12:07 PM2022-02-20T12:07:57+5:302022-02-20T12:09:09+5:30
मागील काही वर्षांपासून अवकाळी पावसामुळे या उत्पादनात घट होत आहे.
विरार : वसई तालुक्यात सर्वात जास्त पांढऱ्या कांद्याचे उत्पादन घेतले जात असे. परंतु मागील काही वर्षांपासून अवकाळी पावसामुळे या उत्पादनात घट होत आहे. होणाऱ्या नुकसानीमुळे कांद्याची शेती करण्याकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली असून, तालुक्यातून पांढरा कांदा हद्दपार होताना दिसत आहे.
वसई तालुक्यात मोठ्या प्रमाणत पांढऱ्या कांद्याचे उत्पादन पूर्वीपासून घेतले जात होते. परंतु या उत्पादनात गेल्या अनेक वर्षांपासून घट होत चालली आहे. जानेवारी महिन्यात कांद्याची लागवड केली जाते आणि या लागवडीसाठी जमीनही दमट स्वरूपाची असावी लागते. परंतु जानेवारी महिन्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातल्यामुळे कांद्याचे बीज खराब झाले. यामध्ये शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. कांद्याची शेती परवडत नसल्यामुळे काही शेतकऱ्यांनी शेती करणे सोडून दिले आहे, असे काही शेतकऱ्यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
पांढऱ्या कांद्याचे उत्पादन प्रामुख्याने वसईतील शिरगाव, खानिवडे, शिवनसई, पारोळ, थल्याचा पाडा, अर्नाळा, वसईगाव या ठिकाणी घेतले जाते. साधारण एका कांद्याची माळ ४० ते ५० रुपयांपर्यंत विकली जाते. त्या माळेचे वजन दोन ते तीन किलो असते. हा कांदा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बाजारात येतो. परंतु शेतकऱ्यांना कांद्याची लागवड ही अवकाळी पावसामुळे दोन वेळा करावी लागली असल्यामुळे कांद्याचे पीक उशिरा येणार असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली.
पांढरा कांदा हा औषधी म्हणूनही ओळखला जातो. त्यामुळे त्याला दर जास्त आणि बाजारात मागणीही असते. मात्र यंदा अवकाळीने पांढऱ्या कांद्याचे पीक वाया गेले.
गेल्या दोन - तीन वर्षांपासून मी पांढऱ्या कांद्याचे उत्पादन घेते. परंतु या उत्पादनातून मला नफा आलेला नाही. कांद्याची लागवड झाल्यानंतर झालेल्या अवकाळी पावसामुळे कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. यामुळे शहरात कांदा पोहोचलेला नाही.
- सुगंधा जाधव,
माजी सभापती, भाताणे