कोरोनाच्या भीतीने व्यापाऱ्यांनी फिरवली पाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 12:46 AM2021-03-01T00:46:01+5:302021-03-01T00:46:18+5:30
कलिंगड उत्पादकांत चिंतेचे वातावरण
- वसंत भोईर
लोकमत न्यूज नेटवर्क
वाडा : या वर्षी कोरोना मारामारीचे संकट, अवकाळी पाऊस पडल्याने भातपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याही परिस्थितीत स्वतःला सावरत तालुक्यातील शेतकऱ्यांनी कलिंगड शेती केली असून पीकही बहरून आले आहे, मात्र या पिकाला तालुक्यात बाजारपेठ उपलब्ध नाही तसेच मालाच्या साठवणुकीसाठी गोडावून उपलब्ध नसल्याचा फायदा व्यापारी उठवत आहेत. त्यातच कोरोनाने परत डोके वर काढल्याने पुन्हा लाॅकडाऊन होण्याची भीती व्यापारी शेतकऱ्यांना दाखवत असून माल खरेदीसाठी येतच नाहीत. यामुळे बहरून आलेले कलिंगडचे उत्पादन कवडीमोल दराने विक्री करण्याची वेळ येथील शेतकऱ्यांवर आली आहे.
वाडा तालुक्यात भाताखालोखाल कडधान्याचे उत्पादन घेतले जाते. यामध्ये वाल, तूर, मूग, हरभरा, तीळ, उडीद, मटकी, चवळी, धणे, राई आदी रब्बी पिके घेतली जातात. परंतु या वर्षी हवामान बदलाचा फटका रब्बी पिकांना बसल्याने ही पिकेही शेतकऱ्यांच्या हातून गेलेलीच आहेत. यातून सावरण्यासाठी कर्जे काढून भाजीपाला, कलिंगड, टरबूज, पपई ही फळशेती करण्याचा प्रयत्न करून भातशेती, रब्बी पिकांतून झालेली हानी भरून काढण्याचा प्रयत्न येथील शेतकरी करू पाहत होता. कलिंगडचे पीकही बहरून आले आहे. मात्र खरेदी करणारे व्यापारी फिरकतच नसल्याने मातीमोल किमतीत कलिंगडची विक्री करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आल्याने बळीराजा मात्र आर्थिक संकटात सापडला आहे. निसर्गाचा लहरीपणा व कोरोना मारामारीचे संकट यावर मात करून येथील शेतकऱ्यांनी कलिंगडची उत्तम शेती केली आहे. पीकही बहरून आले आहे, मात्र योग्य दराने विक्री होत नसल्याची खंत येथील शेतकरी प्रकाश पष्टे यांनी व्यक्त केली.
कलिंगड खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांकडून पुन्हा लाॅकडाऊन होणार असल्याची भीती कलिंगड उत्पादक शेतकऱ्यांना दाखवली जात आहे. यामुळे या उत्पादनातून झालेला खर्चही निघणार नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. कलिंगड शेतीसाठी मी दीड लाख रुपये कर्ज घेतले आहे. त्या कर्जाचा बोजा डोक्यावर चढणार असून घेतलेले कर्ज फेडणार कसे? व संसाराचे रहाटगाडगे हाकणार कसे? ही समस्या उभी राहिली आहे.
- अरुण पष्टे, कलिंगड उत्पादक शेतकरी, डोंगस्ते