वसई किल्ल्यातील फोटोग्राफीला आता लागणार शुल्क
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2017 12:46 AM2017-11-10T00:46:34+5:302017-11-10T00:46:38+5:30
मराठ्यांच्या शौर्याचे प्रतिक असलेल्या वसई किल्ल्यातील गैरधंद्यांविरोधात पुरातत्व विभागाने धडक मोहिम हाती घेतली आहे.
शशी करपे
वसई : मराठ्यांच्या शौर्याचे प्रतिक असलेल्या वसई किल्ल्यातील गैरधंद्यांविरोधात पुरातत्व विभागाने धडक मोहिम हाती घेतली आहे. मद्यपी, प्रेमी युुगुल आणि गैरधंदे करणाºयांना हुसकावून लावण्यासाठी विभागाचे २६ कर्मचारी किल्ल्यात तैनात करण्यात आले आहेत. त्याचबरोबर प्रि वेडींग (विवाहपूर्व) आणि इतर व्यावसायिक फोटोग्राफीसाठी आता शुल्क आकारण्याचा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठविण्यात आला आहे.
मराठ्यांच्या शौर्याची गाथा सांगत असलेल्या वसई किल्ल्यातील गैरप्रकारांविरोधात दुर्ग प्रेमींसह अनेक दुर्ग संवर्धन संघटनांनी विविध मार्गाने आंदोलने सुरु केली आहेत. दुर्गप्रेमींनी गेल्या काही महिन्यांपासून किल्ल्यात सफाई मोहिम, मद्यपी, प्रेमी युुगुलांविरोधात मोहिम, इतिहास ताजा ठेवण्यासाठी किल्ले सफर अशा माध्यमातून वसई किल्ला संवर्धनाचे काम सुरु ठेवले आहे. त्याची दखल घेऊन आता पुरातत्व विभागाने किल्ल्याचे संवर्धन करण्यासोबत किल्ल्यातील गैरधंद्यांना आळा घालण्याचीही मोहिम हाती घेतली आहे.
सध्या वसई किल्ल्यातील सफाई, रखवालदार आणि इतर कामांसाठी पुरातत्व विभागाचे २६ कर्मचारी कार्यरत आहेत. या प्रत्येक कर्मचाºयांना दैनंदिन कामासोबत एक-एक पॉईंट देण्यात आला आहे. या पॉईंटवर देखरेख करून मद्यपी, अश्लिल चाळे करणारी प्रेमी युगुले यासह गैरधंदे करणाºयांना हुसकावून लावण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली असून त्यादृष्टीने कारवाई सुरु झाली आहे, अशी माहिती पुरातत्व खात्याचे वसई उपविभाग अधिकारी कैलास शिंदे यांनी दिली.
सध्या किल्ल्यात प्रि वेडींग फोटोग्राफीसह व्यावसायिक फोटोग्राफीला उधाण आले आहे. दररोज व्यावसायिक फोटोग्राफी केली जात असल्याने पर्यटकांना त्याचा त्रास होतो, त्याचबरोबर सरकारचा महसूलही बुडतो. पुरातत्व विभाग आपल्या हद्दीतील शुटींगसाठी दरदिवशी ५० हजार रुपये शुल्क आणि १० हजार रुपये अनामत रक्कम घेते. तर व्यावसायिक फोटोग्राफीसाठी प्रत्येक दिवशी १० हजार रुपये शुल्क आकारते. मात्र, स्टँड लावून फोटोग्राफी असेल तरच शुल्क आकारणी जात असून स्टँडशिवाय फोटोग्राफी केल्यास त्यास कोणतेही शुल्क आकारण्याची तरतूद नाही. त्यामुळे वसई किल्ल्यात प्रि वेडींगच्या नावाखाली सुरु असलेल्या व्यावसायिक फोटोग्राफीला आवरणे अधिकाºयांना अशक्य होऊन बसले आहे.