महिला अधिकारी हल्ला प्रकरण: तीन दिवसांनंतरही धागेदोरे नाहीत
By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2020 11:06 PM2020-03-10T23:06:37+5:302020-03-10T23:07:53+5:30
जिल्हाभरात विविध पथकांद्वारे शोध
नालासोपारा : महिला दिनाच्या पूर्वसंध्येला शनिवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेच्या वसई युनिटच्या प्रभारी व सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धवा जायभाये यांच्यावर मास्कधारी दुचाकीस्वाराने गोळीबार केला होता. पोलीस कर्मचाऱ्याच्या सतर्कतेमुळे महिला अधिकारी थोडक्यात बचावल्या. या घटनेला तीन दिवस उलटूनही कोणतेही धागेदोरे सापडलेले नाहीत.
विरार, नालासोपारा, मुंबई-अहमदाबाद महामार्ग, टोलनाका, हॉटेल्स, पेट्रोल पंप, ढाबे, रिसॉर्ट आणि महत्त्वाच्या नाक्यावर लावण्यात आलेले सीसीटीव्ही फुटेज मिळवून शोध घेण्याचा प्रयत्न पोलीस करीत आहेत, पण त्यांच्या पदरी निराशा पडत असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून कळते. शनिवारी रात्री फायरिंग झाल्यानंतर संपूर्ण पालघर पोलिसांनी ठिकठिकाणी नाकाबंदी करून आरोपीला पकडण्यासाठी कंबर कसली होती. पण ज्या दुचाकीवरून आरोपी आला होता, ती दुचाकी किंवा तिचा नंबरही मिळाला नसल्याने पोलीस हताश झाले आहेत. पोलीस अधीक्षक यांच्या हाताखाली आणि त्यांची अत्यंत विश्वासू अशी स्थानिक गुन्हे शाखेची टीम असते. पण याच टीमच्या महिला अधिकाºयावर आरोपीने हल्ला केला असल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्येही भीतीचे वातावरण आहे. पोलीस अधिकाऱ्यांवर हल्ला करून तीन दिवस उलटूनही आरोपीचा अद्याप थांगपत्ता लागत नसल्याने पोलीस महिलांची सुरक्षा कशी काय करतील? असा प्रश्नही नागरिकांनी उपस्थित केला आहे. या आधीही विरार येथील नदीकिनारी रेती माफियांनी पोलीस अधीक्षकांवर जीवघेणा हल्ला केला असल्याचेही बोलले आहे. हा हल्ला नेमका कुणी केला? का केला? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे शोधत पोलीस पथके गुन्ह्याचा खोलवर तपास करत आहेत. तरीही पोलिसांच्या हाती अद्यापपर्यंत काहीच सापडले नाही. याबाबत वरिष्ठ अधिकाºयांना विचारले असता, तपास चालू आहे, अशी उत्तरे देण्यात येत आहेत.
महिला अधिकाºयांवर झालेल्या गोळीबाराच्या तपासासाठी सहा पथके बनवली आहेत. सदर गुन्ह्याचा तपास सुरू आहे. त्या महिला अधिकारीचे जाबजवाब घेऊन टिपण झाले असून चौकशी करत आहोत. -अमोल मांडवे, तपास अधिकारी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी, नालासोपारा.
फायरिंग प्रकरणाचा गुन्हा उघडकीस येणे फार महत्त्वाचे आणि गरजेचे असल्याचे पोलीस अधिकाºयांनी ‘लोकमत’ला सांगितले आहे. जेणेकरून यामागे नेमके कोण आणि कुणाचा हात आहे हे उघड होईल.