दिवाळीनिमित्त घोर नृत्योत्सवाची पर्वणी, स्वातंत्र्य पूर्व काळातील परंपरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2017 05:31 AM2017-10-20T05:31:40+5:302017-10-20T05:31:54+5:30
महाराष्ट्र गुजरात सीमेवरील डहाणू तालुक्यात दिवाळी सणानिमित्त घोर हा नृत्य प्रकार केले जातात. या वेळी विविध जातीचे, वयोगटातील पुरु ष शृंगार करून नाच करतात.
- अनिरुद्ध पाटील
बोर्डी : महाराष्ट्र गुजरात सीमेवरील डहाणू तालुक्यात दिवाळी सणानिमित्त घोर हा नृत्य प्रकार केले जातात. या वेळी विविध जातीचे, वयोगटातील पुरु ष शृंगार करून नाच करतात.
धनत्रयोदशीच्या दिवशी या नृत्याविष्काराला सुरुवात होऊन बलिप्रतिपदेला सांगता होते. येथील स्थानिक गुजराती भाषिक समाजात घोर नृत्योत्सवाला अनन्यसाधारण महत्व आहे. परगावतील पर्यटकांसाठी ही पर्वणीच ठरली आहे. तथापि हा नाच पाहण्यासाठी दरवर्षी पर्यटकांची संख्या वाढताना दिसत आहे.
लोखंडी सळईच्या गोलाकार रिंगणात घुंगरू घातलेले घोर हे पारंपरिक वाद्य आहे. हा पुरुषप्रधान नाचप्रकार असून जोडीदाराच्या साह्याने घोरीच्या तालावर सामूहिक नाच प्रकार आहे. दोन ते तीन प्रकारे फेर धरून तर कधी गुढगा जमिनीला टेकवत नाच केला जातो. एका समूहात बारा ते पंधरा जोड्या असतात. डोक्यावर फेटा, अंगात बणीयान त्यावर लुगड्यांची नक्षीदार जाळी विणली जाते.
पांढºया धोतरामुळे व्यक्तिमत्व रु बाबदार दिसते. त्यानंतर झेंडू फुलांच्या माळांनी नर्तकाचा छाती आणि कमरेचा भाग सजवला जातो. कमरेला बांधलेल्या घुंगरूमुळे लयबद्ध संगीत निर्माण होते. डोळ्यात काजळ घातल्याने सौंदºयात भर तर पडतेच व्यक्तिमत्वही रांगडे दिसते. एका हातात दांडिया तर दुसºया हातात मोरपंखाचा गुछा असल्याने हा पेहराव बघ्यांचे लक्ष वेधून घेतो.
बगळी (८ ते १० फुट उंच बांबूच्या टोकावर कापडाने बनवलेली बगळ्यांची जोडी) मध्यभागी धरली जाते. कवया (गायक) घोर हे वाद्य हाताच्या मुठीत घेऊन पारंपरिक गाण्यांच्या सुरावतीवर वाजवतो. कवया गाणे गाताना गणपती, राम-कृष्ण आणि ग्रामदैवतांची स्तुतीपर कवण गायली जातात. पारतंत्र्यकाळात इंग्रजांच्या विरूद्ध स्वकीयांना जागृत करण्यासाठी घोर नृत्योत्सवाच्या माध्यमातून जनजागृती व्हायची.