किल्ल्यात साकारले वसईच्या संग्रामाचे भित्तीचित्र

By admin | Published: January 10, 2017 05:49 AM2017-01-10T05:49:57+5:302017-01-10T05:49:57+5:30

वसई-विरारच्या भूमिपुत्रांना पोर्तुगीजांच्या छळातून मुक्त करण्यासाठी नरवीर चिमाजी आप्पांनी ‘वसईची मोहीम’ हाती घेतली व डोंगर, दऱ्या, नद्या ओलांडत साष्टीत दाखल झाले.

The festivities of the Vasai movement in the fort built in the fort | किल्ल्यात साकारले वसईच्या संग्रामाचे भित्तीचित्र

किल्ल्यात साकारले वसईच्या संग्रामाचे भित्तीचित्र

Next

सुनील घरत / पारोळ (ता.वसई)
वसई-विरारच्या भूमिपुत्रांना पोर्तुगीजांच्या छळातून मुक्त करण्यासाठी नरवीर चिमाजी आप्पांनी ‘वसईची मोहीम’ हाती घेतली व डोंगर, दऱ्या, नद्या ओलांडत साष्टीत दाखल झाले. या मोहिमेत २५ हजार घोडदळ, ४० हजार पायदळ, ४ हजार सुरुंग तज्ज्ञ, ५ हजार उंट, ५० हत्ती होते. वसईला मुक्त, सुखी व समृद्ध करण्यासाठी हाती घेतलेल्या या मोहिमेत मराठ्यांचे जवळपास २२ हजार सैनिक हुतात्मा झाले. वज्राईच्या कृपेने व मराठ्यांच्या पराक्र मामुळे पोर्तुगीज हारले व भगवा जरीपटका वसईच्या जंजिऱ्यावर फडकला. एकाच मातीचे, एकाच रक्ताचे, एकाच संस्कृतीच्या, भाषेच्या हिंदू व धर्मांतरीत ख्रिस्ती बांधवांनी स्वराज्य व सुराज्य लाभल्यामुळे आनंदी होऊन आप्पांना नजराणे समर्पित केले. एकूण एक फिरंगी वसई सोडून गेला. या संग्रामाचे भित्तीचित्र आज वसई किल्ल्यात साकारण्यात आले.
वसई मोहिमेतील दगदग व प्रचंड हाल अपेष्टांमुळे एकाच वर्षात वयाच्या अवघ्या ३४ व्या वर्षी पौष शुक्ल पक्ष दशमी, शके १६६२ रोजी दम्याच्या आजाराने चिमाजी अप्पांचे देहावसान झाले. पौष शु.एकादशीस आप्पांच्या अर्धांगिनी सौ.अन्नपूर्णाबाई सती गेल्या व त्यांचे स्वर्गारोहण झाले, असे पुण्यातील आप्पांच्या समाधीवर नमूद केले आहे.
अशा या पराक्र मी, बुद्धिमान, ओजस्वी, कर्तव्यदक्ष, दयाळू व सिहष्णू नरवीर चिमाजी आप्पांची पुण्यतिथी सालाबादाप्रमाणे आमची वसईने चिमाजी आप्पा स्मारक, वसई किल्ला येथे ८ जानेवारी, २०१७ रोजी सायंकाळी ५.३० वाजता साजरी केली. मशाली व पण त्यांच्या विलोभनीय प्रकाशात, तुतारीच्या गजरात, चिमाजी आप्पांना वसईच्या संग्रामाचे भित्तीचित्र समर्र्पित करु न आदरांजली वाहण्यात आली.
वसई किल्ल्यात अनेक पर्यटक येतात. पण वसई किल्ल्याचे महत्व व इतिहास काय आहे, चिमाजी आप्पा कोण होते, त्यांचे जीवन कसे होते, या संबंधी कुठेही माहिती उपलब्ध होत नाही. येणाऱ््या पर्यटकांना इतिहास व त्याचे गांभीर्य कळावे या हेतूने ‘आमची वसई’ ने स्मारका बाहेरील भिंतिवर वसईच्या संग्रामाचे चित्र व नरवीर चिमाजी आप्पांची संक्षिप्त माहिती सादर केली आहे. त्याचप्रमाणे स्वराज्य व सुराज्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या वीर मराठ्यांकडून व वयाच्या अवघ्या ३४ व्या वर्षी स्वर्गवासी होणाऱ्या नरवीर चिमाजी आप्पांच्या जीवनातून बोध घेत युवा पिढीने किल्ल्याचे पावित्र्य राखावे. त्याचप्रमाणे विकासाच्या नावाखाली विनाश तर होत नाही ना? याचे भान ठेऊन आपली संस्कृती, बोलीभाषा, परंपरा, निसर्ग, ऐतिहासिक वास्तू, इत्यादी जतन करण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन टीम आमची वसईने केले.

Web Title: The festivities of the Vasai movement in the fort built in the fort

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.