वसई पालिका आयुक्तांविरुद्ध अवमान याचिका दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2020 11:28 PM2020-06-16T23:28:03+5:302020-06-16T23:28:18+5:30
आयुक्तालय निवासस्थानात तोडफोड; गाळ्याचा बेकायदेशीर ताबा
वसई/नालासोपारा : न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करून वसई-विरार महापालिकेचे आयुक्त गंगाथरन डी. यांनी दिवाणमान येथील आयुक्त निवासस्थानाच्या तळमजल्यावरील गाळ्याचा बेकायदेशीररीत्या ताबा घेऊन तोडफोड केल्याप्रकरणी वसई कोर्टात अवमानना याचिका दाखल करण्यात आली आहे.
वसई न्यायालयाचा मनाई आदेश असतानाही हुकूमशाही पद्धतीने आयुक्त गंगाथरन डी. यांनी आयुक्तालयाच्या तळमजल्यावरील गाळा ताब्यात घेऊन त्यात तोडफोड केली, असा आरोप करून गाळाधारक आरिफ चुनावाला यांनी ही याचिका दाखल केली आहे. या याचिकेत आयुक्त गंगाथरन, उपायुक्त गिल्सन गोन्साल्वीस व कंत्राटदार बालाजी जाधव यांना तुरुंगात ठेवण्याची आणि त्यांची मालमत्ता जप्त करण्याची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, उच्च न्यायालयाने कोरोना काळात महापालिकांनी आततायी कारवाई न करण्याचे सुचविले होते. तरीही आयुक्तांनी कारवाई केली, ज्यास वसई कोर्टाने प्रतिबंध केला होता. त्याची पूर्वसूचना मिळूनही त्या जागेत बाहेर पडदा लावून घाईघाईने बांधकाम पूर्ण करण्याचा अट्टाहास सुरू आहे, असे याचिकाकर्त्यांचे वकील दिगंबर देसाई म्हणाले. त्याबाबतचे पुरावे न्यायालयात दाखल केले आहेत. याबाबत आयुक्तांना संपर्ककेला असता त्यांनी फोन उचलला नाही.
हा विषय नेमका काय आहे हे वकीलच सांगू शकतील. याचिकाकर्त्याने अवमानना याचिका दाखल केली आहे, याबाबत आमच्याकडे काहीही माहिती नाही.
- गिल्सन गोन्साल्वीस, साहाय्यक आयुक्त, वसई-विरार मनपा