समेळ पाड्यातील मुख्य खाडीवर भराव; पालिका कारवाई करणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2019 12:41 AM2019-12-11T00:41:49+5:302019-12-11T00:42:10+5:30
नालासोपारा पुन्हा जलमय होणार
नालासोपारा : शहरातील पश्चिमेकडील भागातील पावसाळी पाण्याचा निचरा करणाऱ्या मुख्य खाडीवर (नाल्यावर) भराव टाकल्यामुळे नालासोपारा पुन्हा जलमय होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याच ठिकाणी बाजार भरवण्यात येणार असल्याचा फलकही लावण्यात आला होता. तो महापालिकेने काढला असला तरीही बिनधास्तपणे भरणी कशी काय करण्यात आली? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.
गेल्या तीन-चार वर्षापासून पावसाळ्यात वसई तालुका जलमय होत आहे. पावसाळी पाण्याचा निचरा करणाºया खाड्या, मोठे नाले यांची पावसाळ्यापूर्वी सफाई करण्यात आली नाही. तसेच काही खाड्यांवर भराव टाकण्यात आल्यामुळे वसईकरांवर पूरस्थिती ओढवली होती. यानंतर वसई तालुका यापुढे जलमय होणार नाही, अशी ग्वाही आमदार हितेंद्र ठाकूर यांनी दिली होती. मात्र ठाकूर यांच्या या आश्वासनाला त्यांच्याच पदाधिकाऱ्यांनी गालबोट लावले असल्याचे बोलले जात आहे.
नालासोपारा पश्चिमेकडील मुख्य खाडीवर एका बांधकाम व्यावसायिकाने भराव टाकून आपल्या कार्यालयापर्यंत जाण्यासाठी रस्ता तयार केला आहे. या प्रकाराची माहिती देऊनही महापालिकेकडून कोणतीच कारवाई करण्यात आली नाही. या जागेवर आठवडा बाजार आणि खाऊ गल्ली सुरू करण्याचे जाहीर करून तसा फलकही या ठिकाणी लावण्यात आला. यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
नालासोपारा पूर्व आणि पश्चिम तसेच विरारमधील पावसाळी पाण्याचा निचरा करणाºया समेळपाडा येथील या मुख्य खाडीवर सोपारा मुख्य रस्त्यावरील पुलापासून समेळपाडा नवीन स्मशानभूमीच्या पूर्व बाजूपर्यंत सुमारे दहा फूट रुंद आणि शंभर फूट लांबीचा भराव करण्यात आला आहे. त्यामुळे पावसाळ्यात नालासोपारा शहर जलमय होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याबाबत ई प्रभाग समितीचे सभापती अतुल साळुंखे यांची प्रतिक्रि या विचारण्यासाठी तीन वेळा फोन केला, परंतु त्यांनी फोन न उचलल्याचे त्यांची प्रतिक्रि या मिळू शकली नाही.
याबाबत मला माहिती मिळाल्यावर बाजाराचा लावण्यात आलेला बोर्ड काढून टाकला असून सदर ठिकाणी कोणी भरणी केली याचा शोध घेत आहे. ज्याने कोणी मातीची भरणी केली आहे त्याच्यावर कारवाई करणार आहोत. -रागेश राठोड, सहाय्यक आयुक्त,
ई प्रभाग, वसई विरार महापालिका)