भराडला ‘सूर्या’चा सेतू कोसळला, पाईप व बांधकामास दिला होता सळ्यांनी आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2017 03:09 AM2017-10-26T03:09:35+5:302017-10-26T03:09:40+5:30
कासा : डहाणूतील सूर्या कालव्यांची दुरूस्ती न झाल्याने कालव्याअंतर्गत येणा-या शेतपिकांवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.
शशिकांत ठाकूर
कासा : डहाणूतील सूर्या कालव्यांची दुरूस्ती न झाल्याने कालव्याअंतर्गत येणा-या शेतपिकांवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. सात वर्षापूर्वी नादुरूस्त झालेला भराड येथील कालव्याचा जलसेतू पूर्ण कोसळला आहे. त्यामुळे त्यापुढील गांवांचा यंदा पाणीपुरवठा बंद होणार आहे.
डहाणू तालुक्यातील कासाजवळ सूर्या उजवा कालव्याअंतर्गत लघु कालव्यातून भराड व त्यापुढील गावांना पाणीपूरवठा करण्यासाठी भराड येथे येथे लघु कालव्याला जोडणारा जलसेतू बांधण्यात आला होता. मात्र सात वर्षापूर्वी तो मध्यभागी तुटून त्याची दोन्ही टोके जमिनीवर टेकली होती. त्यामुळे या गावांचा उन्हाळयातील भातशेतीच्या हंगामाचा पाणीपुरवठा बंद झाल्याने जलसंपदा विभागाने तात्काळ पाईप टाकून तात्पुरती व्यवस्था करून दिली. मात्र दरवर्षी लाखो रूपयांची कालव्यांची कामे केल्याचे कागदोपत्री दाखविले जात असतांना या सात वर्षापूर्वी तुटून पडलेल्या धोकादायक जलसेतूची मात्र दुरूस्तीच केली नाही.
या जलसेतूचा भाग जमीनीवर टेकून राहिला होता त्यांच्यावरून दोन लघुकालव्यांना पाणी जाण्यास पाईप टाकला होता व या पाईपाला लोखंडी सळयांचा आधार दिला होता. हा आधारही कमकुवत असल्याने महिनाभरापूर्वी पूर्ण पाईप लाईन ही कोलमडून पडली आहे. त्यामुळे महिनाभरात या जलसेतूचे बांधकाम केले नाही तर यंदा भराड व त्यापुढील गावांच्या कालव्यातून होणारा पाणी पुरवठा बंद होणार आहे. त्यामुळे त्यांची रोजीरोटी बुडणार असून रोजगारासाठी स्थलांतरीत होण्याची पाळी त्यांच्यावर ओढावणार आहे.
>बळीराजाची शेती यंदा ओस पडणार
सूर्या कालव्याअंतर्गत उन्हाळयात शेतीला होणाºया पाणीपुरवठयातून कासा, वाणगांव, आदी भागातील शेतकरी पावसाळयाप्रमाणे उन्हाळयातही भातशेती, भाजीपाला आदि पीके घेतात. मात्र भराड व त्यापुढील गावांना जलसेतू कोसळल्याने शेती ओस टाकण्याची पाळी येणार आहे.