अखेर वसईत साकाणार १०० खाटांचे रुग्णालय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2018 05:32 AM2018-12-17T05:32:55+5:302018-12-17T05:33:14+5:30
मुख्यमंत्र्यांचे आदेश : अंतिम मंजुरीसाठी ४२ कोटीचे अंदाजपत्रक आरोग्यविभागाला सादर
सुनिल घरत
पारोळ : वसई तालुक्याची वाढती लोकसंख्या पाहता येथील जनतेला सरकारी आरोग्य सुविधा मिळणे गरजेचे आहे. गेल्या २८-३० वर्षात वसई विरार तालुक्याचे नागरीकरण प्रचंड झाले तरी एकही सुसज्ज सरकारी रुग्णालय उभे राहिले नाही. वसईत व विरारमध्ये १०० खाटांचे उपजिल्हा रूग्णालय सरकारने तात्काळ मंजूर करावे व त्याचे काम जलदगतीने सुरु करावे, अशी मागणी जनतेने केली आहे. याबाबत स्थानिकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले. त्यावर त्यांनी तात्काळ कार्यवाहीच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत.
वसई रोड पश्चिमेला मौजे नवघर येथे सध्याच्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परीसरात साधारण ५८ गुंठे जागेत नवे १०० खाटांचे उपजिल्हा रूग्णालय साधारण तीन वर्षांपूर्वी मंजूर करण्यात आले आहे. प्रत्यक्षात या जागेत उपजिल्हा दर्जाच्या रुग्णालयाचे कोणतेही काम आजवर सुरू होऊ शकलेले नाही. तालुक्याची लोकसंख्या वाढली आहे. त्यामुळे हे उपजिल्हा रूग्णालय आजवर मार्गी लागणे गरजेचे होते. सध्या नवघर येथे प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू असून या केंद्राद्वारे किरकोळ आजावरांवर प्रथमोपचार केले जातात. तेथे उपजिल्हा रूग्णालय उभे राहिल्यास सर्व गंभीर आजारांवर उपचार व शस्त्रक्रीया होऊ शकतील.
वसई रोड पश्चिमेला मौजे नवघर येथे उपजिल्हा रूग्णालय उभारण्याच्या कामाचे अंदाजपत्रक व आराखडा सार्वजनिक बांधकाम विभागाने सार्वजनिक आरोग्य विभागाकडे ८ महिन्यांपूर्वी मंजुरीसाठी पाठविले आहे. नवघर येथील ५८ गुंठे जागेत १०० खाटांचे उपजिल्हा रूग्णालय उभारण्यासाठी तळ अधिक दोन मजली इमारत बांधणे प्रस्तावित आहे. त्यात १०० खाटा, आॅपरेशन रूम व इतर सर्व रूग्णालयाच्या सोयी सुविधा देणे प्रस्तावित आहे. आता याचे काम कधी सुरु होते याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
वाट पाहावी लागली
च्हे उपजिल्हा रूग्णालय उभारण्यासाठी साधारण ४२ कोटी खर्चाचे अंदाजपत्रक अंतिम मंजुरीसाठी वसईतील सार्वजनिक बांधकाम विभागाने सरकारकडे पाठवले आहे अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी वाघ यांना दिली. ही सर्व प्रक्रि या गेल्या ३ वर्षात होणे गरजेचे होते. मात्र कुणी हे रुग्णालय व्हावे म्हणून प्रयत्न केले नाहीत.