अखेर २४ तासांनी समुद्रात वाहून गेलेली कार जेसीबीच्या साहाय्याने काढली बाहेर
By पूनम अपराज | Published: December 31, 2020 08:36 PM2020-12-31T20:36:00+5:302020-12-31T20:36:40+5:30
Vasai News : दोघांनी सकाळी आपली चारचाकी जागेवर नसल्याचे पहिले असता ती चारचाकी समुद्राच्या पाण्यात वाहत जाऊन भुईगाव किनाऱ्यावर जाऊन अडकल्याचे दिसून आले.
वसईतील कळंब समुद्र किनाऱ्यावर पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून आलेली स्विफ्ट कार अखेर २४ तासानंतर बाहेर काढण्यात आली. जेसीबीच्या सहाय्याने स्विफ्ट कारला बाहेर काढण्यात यश आलं आहे. कळंबच्या समुद्र किनाऱ्यावरुन वसईच्या भुईगाव समुद्र किनाऱ्यापर्यंत कार भरतीच्या पाण्यात वाहत आली होती.
बुधवारी सकाळी गस्तीवर असणाऱ्या पोलिसांना ही कार पाण्यात बुडालेल्या अवस्थेत आढळून आली होती. वसईतील एका तरुण तरुणीला मौजमजेसाठी कळंब समुद्र किनाऱ्यावर फिरण्याचा उत्साह चांगलाच अंगलट आला. मंगळवारी सायंकाळी हे तरुण तरुणी फिरण्यासाठी आपली स्विफ्ट कार घेऊन समुद्र किनाऱ्यावर गेले होते. रात्रीच्या वेळी त्याच ठिकाणी थांबण्याचा बेत त्यांनी आखल्याने त्यांनी आपली कार किनाऱ्यावरच पार्क केली होती. मात्र, रात्री भरतीच्या पाण्यासोबत कार पाण्यात वाहून गेली. दोघांनी सकाळी आपली चारचाकी जागेवर नसल्याचे पहिले असता ती चारचाकी समुद्राच्या पाण्यात वाहत जाऊन भुईगाव किनाऱ्यावर जाऊन अडकल्याचे दिसून आले.
तरुण तरुणीचा मौज मजेचा उत्साह चांगलाच आला अंगलट, कार गेली समुद्रात वाहून
त्यानंतर याबाबत तात्काळ वसई पोलिसांना, अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले होते. ढवळत असलेल्या समुद्राच्या पाण्यामुळे कार बाहेर काढणे जिकिरीचे होत असून आज ही कार अथक प्रयत्न करून बाहेर काढण्यात आली आहे.