... अखेर बाणगंगा पुलाला मुहूर्त सापडला
By admin | Published: November 28, 2015 10:35 PM2015-11-28T22:35:31+5:302015-11-28T22:35:31+5:30
तारापुर अणुऊर्जाचे दोन प्रकल्प व भाभा अणुसंशोधन केंद्रा (बीएआरसी) चा प्रकल्प तसेच बोईसर ते तारापुर-चिंचणी- डहाणूसह सुमारे पन्नास गाव-पाड्यात जोडणाऱ्या अतिशय महत्वाच्या
- पंकज राऊत, बोईसर
तारापुर अणुऊर्जाचे दोन प्रकल्प व भाभा अणुसंशोधन केंद्रा (बीएआरसी) चा प्रकल्प तसेच बोईसर ते तारापुर-चिंचणी- डहाणूसह सुमारे पन्नास गाव-पाड्यात जोडणाऱ्या अतिशय महत्वाच्या अशा बोईसर-तारापूर रस्त्यावरील बाणगंगेवर अतिरीक्त पूल बांधणीचे काम अखेर शुक्रवार (दि. २७) पासून सुरू करण्यात आले आहे. तर हा कमकुवत पूल धोकादायक स्थितीत असून तो नव्याने बांधण्याची नितांत गरज असल्याचे वृत्त लोकमतमध्ये प्रसिद्ध करण्यात आले होते.
सात मीटर रूंद व प्रत्येकी साडेसात मीटरच्या तीन गाळ्यांचा साडेबावीस मीटर लांबीचा हा पूल बाणगंगेवर बांधण्याकरीता न्युक्लीयर पॉवर कॉर्पोरेशनने (एनपीसीआयएल) टीएम्सी/सीएसआर/२०११ पत्रान्वये दि. २८ आॅक्टोबर २०११ रोजी प्रशासकीय मान्यता देऊन ५४ लाख ८७ हजार २४५ रू. रक्कमेस तांत्रिक मान्यता दिली. त्यानुसार अणुऊर्जा केंद्राच्या एनपीसीआयएलने त्यांच्या सामाजिक जबाबदारी निधीतून (सीएसआर) ८३३२०८ या क्रमांकाच्या धनादेशाद्वारे दि. १९ जाने. २०१२ रोजी कार्यकारी अभियंता ठाणे सार्वजनिक विभाग ठाणे यांना निधीही देण्यात आला होता.
एनपीसीआयसी ने पूल उभारणीकरीता लागणारा संपूर्ण निधी सा. बा. खात्याला दिला असताना तसेच त्याचे भूमीपूजन माजी आदिवासी विकासराज्यमंत्री राजेंद्र गावितांनी २७ डिसेंबर २०१२ रोजी केले होते. त्यानंतर वेगवेगळ्या तांत्रिक अडचणी सा. बा. खाते व अणुऊर्जा प्रशासनाकडून निर्माण झाल्या. दोन्ही मधल्या समन्वयाचा अभाव लालफितीचा गोंधळ सध्याच्या पुलाजवळून गेलेल्या ३३ के. व्ही. क्षमतेच्या विद्युत वाहिनीच्या स्थलांतरास झालेला विलंब इ. अनेक कारणामुळे नवीन पुलाचे बांधकाम खोळंबले. पूल बांधणीचा खर्च रू. १८ लाख ३६ हजाराने वाढला. या वाढीव खर्चास अजून मान्यता मिळाली नसल्याचे समजते हा वाढीव खर्चाचा भुर्दंड कोणाच्या माथी टाकणार हा ही प्रश्न असून २०१२-१३ च्या टेंडर नुसारच हे काम करण्यात येणार आहे. पूल बांधणीचे काम शिवसाई एजन्सी करणार आहे पूल बांधणीची मुदत सहा महिन्याची आहे. आॅगस्ट २०१४ मध्ये पालघर जिल्ह्याची निर्मिती झाल्यानंतर जिल्हाधिकारी अभितीत बांगर यांनी सव्वा वर्षानंतर खऱ्या अर्थाने २० नोव्हेंबर २०१५ रोजी तारापुर अणुऊर्जा प्रकल्पाच्या जिल्हास्तरीय आपत्कालीन उपाययोजना समितीची बैठक घ्ोतली. त्यावेळी जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप शिंदे, जिल्ह्याच्या पोलीस अधिक्षक शारदा राऊत, अणुऊर्जा केंद्राचे वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते. त्या बैठकीत अणुऊर्जा केंद्रातील आकस्मित दुर्घटनेच्या परिस्थितीत किरणोत्सर्गाच्या संसर्गापासून परिसरातील नागरीकांचा जलद बचाव करण्यासाठी अणुकेंद्राला जोडणाऱ्या मार्गाचे रूंदीकरण प्राधान्याने हाती घेण्याचे आदेश दिल्यानंतर प्रशासनाला जाग येऊन अखेर खोळंबलेल्या बाणगंगेवरील पुलाचे बांधकाम सुरू झाले आहे.
- बाणगंगा पुलाखालील काँक्रीट उखडून लोंबकळणाऱ्या सळ्या, पुलाच्या स्ट्रक्चर बरोबरच कठड्याची झालेली भयावह स्थिती, क्षमतेपेक्षा जास्त पुलावरून वाहत असलेली अवजड वाहने, पूल कोसळल्यास अतिसंवेदनशील अणुप्रकल्पाबरोबरच पन्नास गावाचा संपर्क तुटण्याची शक्यता तसेच ब्रिटीश कालीन बांधण्यात आलेल्या पुलाचे संपलेले आयुष्यमान, अणुकेंद्रात आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास पुलाचे असलेले महत्व या सर्व गंभीर बाबी लोकमतच्या माध्यमातून अनेक वेळा निदर्शनास आणून दिले होते. तर पास्थळचे उपसरपंच गणेश घरत यांनीही हा पूल बांधण्याकरिता ग्रामपंचायतीच्या माध्यमातून अनेक वेळा सा. बा. खात्याकडे पत्रव्यवहार केला होता.