अखेर महापौर रुपेश जाधव यांचा राजीनामा मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2019 01:12 AM2019-08-07T01:12:48+5:302019-08-07T01:13:00+5:30

नवीन महापौरासाठी किमान दोन आठवडे; लवकरच कोकण विभागीय आयुक्तांकडे प्रस्ताव

Finally, Mayor Rupesh Jadhav resigned | अखेर महापौर रुपेश जाधव यांचा राजीनामा मंजूर

अखेर महापौर रुपेश जाधव यांचा राजीनामा मंजूर

Next

- आशिष राणे

वसई : वसई - विरार शहर महानगरपालिकेचे मावळते महापौर रूपेश जाधव यांनी गेल्या गुरुवारी आपल्या महापौर पदाचा राजीनामा दिला होता. या राजीनामा वृत्ताची बातमी सर्वत्र पसरल्यावर वसईच्या राजकरणात मोठी उलथापालथ झाली.

रूपेश जाधव यांनी हा राजीनामा प्रथम पक्षाच्या अध्यक्षांकडे दिला आणि नंतर तो पालिका आयुक्तांना सादर केला होता. दरम्यान, महापौरांच्या राजीनामा मंजुरीसाठी वसई विरार महापालिकेने आयुक्तांच्या आदेशाने ५ आॅगस्ट, सोमवारी एका विशेष महासभेचे आयोजन केले होते. त्या महासभेत रुपेश जाधव यांचा हा राजीनामा सर्वानुमते मंजूर करण्यात आल्याची माहिती आयुक्त बी.जी.पवार यांनी ‘लोकमत’ दिली.

सोमवारी एका विशेष महासभेचे पालिका कार्यालयात आयोजन केले होते. या महासभेत जाधव यांचा राजीनामा मंजूर करणे हा विषय पटलावर ठेवण्यात आला असता, कुठलाही गाजावाजा न करता हा राजीनामा अखेर मंजूर करण्यात आला. यावेळी सभागृहात उपमहापौर प्रकाश रॉड्रिक्स, आयुक्त बी.जी.पवार, अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे, अतिरिक्त आयुक्त रमेश मनाले आणि सभागृहातील बहुतांश नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी सभागृहात कुठल्याही स्वरूपाची चर्चा न करता सर्वानुमते हा राजीनामा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. सभागृहात पहिल्यांदाच उपमहापौर प्रकाश रोड्रिक्स यांनी महापौर पदाचा कार्यभार सांभाळल्याचे चित्र सभागृहात बघायला मिळाले.
वसई - विरार शहर महापालिकेची निवडणूक २०१५ मध्ये झाली होती. सुरुवातीला महापौरपद महिलांसाठी अडीच वर्षे राखीव होते. यामुळे बहुजन विकास आघाडीचे पक्ष प्रमुख आ. हितेंद्र ठाकूर यांच्या पत्नी प्रवीणा हितेंद्र ठाकूर या महापौरपदी विराजमान झाल्या.
अडीच वर्षे महापौर पदाची धुरा सांभाळल्यानंतर रूपेश जाधव यांची महापौरपदी निवड करण्यात आली. मात्र अवघ्या १५ महिन्यांतच त्यांनी आपल्या महापौरपदाचा राजीनामा बविआच्या पक्षाध्यक्षांकडे सादर केला होता.

महापौर निवडणूक लवकरच
सोमवारच्या विशेष महासभेत मावळते महापौर रुपेश जाधव यांचा महापौर पदाचा रीतसर राजीनामा तर सभागृहाने अखेर मंजूर केला. आता यापुढे पालिका आयुक्तांच्या माध्यमातून हा प्रस्ताव विभागीय (महसूल) कोकण आयुक्तांकडे सोपविण्यात येईल.
त्यानंतर कोकण आयुक्त यांच्या आदेशाने नव्या महापौर निवडणूक प्रक्रियेसाठी पुन्हा हा प्रस्ताव पालघर जिल्हाधिकारी यांच्याकडे सोपविण्यात येईल. त्यानंतर पालघर जिल्हाधिकारी नियुक्त करतील त्या पीठासीन अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली महापौर निवडीसाठी पुन्हा नव्याने पालिका सभागृहात निवडणूक कार्यक्र म निश्चित केला जाईल.

Web Title: Finally, Mayor Rupesh Jadhav resigned

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.