अखेर पोलिसांनी बुजविले महामार्गावरील खड्डे; वाहतूककोंडी होत असल्याने उचलले पाऊल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2020 11:59 PM2020-08-11T23:59:22+5:302020-08-11T23:59:32+5:30
मुंबई, ठाणे व इतर उपनगरांत जाणाऱ्या प्रवाशांचा खोळंबा
नालासोपारा : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील नायगाव येथील मालजीपाडा गावाच्या हद्दीत पूल बनविण्याचे काम सुरू आहे. पावसामुळे याच रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहतूककोंडी मोठ्या प्रमाणात होत असल्याने वाहतुकीच्या खोळंब्याची मोठी समस्या निर्माण झाली होती.
महामार्गावर सोमवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास याच ठिकाणी प्रचंड वाहतूककोंडी झाली होती. मुंबई, ठाणे व इतर उपनगरात जाणाºया प्रवाशांचा खोळंबा झाला होता. अंदाजे दोन किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. वाहतूककोंडीची माहिती मिळाल्यानंतर महामार्गावरील पोलीस पोहचले. खड्ड्यांमुळे होत असलेल्या वाहतूककोंडीकडे कोणीही लक्ष देत नसल्याने दररोज प्रवाशांना त्रास होत असल्याने हे खड्डे बुजविण्यासाठी पोलिसांनी पाऊल उचलले. त्यांनी आजूबाजूला असलेली माती आणि दगड टाकून खड्डे बुजविण्यास सुरुवात केली. यानंतर काही वेळाने वाहतूक सुरळीतपणे झाली. कोरोनाच्या काळात पोलिसांनी खड्डे बुजविण्याचे काम केल्याने वाहन चालकांनी त्यांची स्तुती केली.
तीन दिवसांपूर्वी जोरदार पाऊस पडल्याने निर्माण झालेल्या खड्ड्यांमुळे सोमवारी मोठी वाहतूककोंडी झाली होती. पोलिसांनी स्वत: खड्ड्यांमध्ये माती व दगड टाकून ते बुजविल्यावर वाहतूककोंडी हटविण्यात यश आले. पावसाळ्यापूर्वी खड्ड्यांबाबत पत्रव्यवहारही केला होता.
- नरेंद्र वडे, पोलीस उपनिरीक्षक, चिंचोटी पोलीस चौकी, महामार्ग पोलीस.