अखेर स्थानिकांना प्राधान्य देत पुन्हा लसीकरण सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2021 11:31 PM2021-05-04T23:31:29+5:302021-05-04T23:31:43+5:30
पालघर जिल्ह्यात लसींचा साठा कमी असल्याने मंदगती : नागरिकांमध्ये नाराजी
लोकमत न्यूज नेटवर्क
जव्हार : पालघर जिल्ह्यात लसींचा पुरेसा साठा शिल्लक नसल्याने लसीकरण मोहीम अगदी संथगतीने सुरू आहे. दरम्यान, सोमवारी बाहरेच्या व स्थानिकांच्या लसीकरणावरून जव्हार येथे वाद झाल्यामुळे एका दिवसासाठी लसीकरण केंद्र बंद ठेवण्यात आले होते, मात्र मंगळवारी सकाळी ९ ते ११ या वेळेत लसीकरण करण्यात आले. यात जास्तीत-जास्त स्थानिकांना लसीकरण करण्यात आले असून, केंद्र पुन्हा सुरळीत सुरू करण्यात आले आहे.
केंद्र शासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसार ऑनलाईन अर्ज भरताना लसीकरण केंद्राचे पर्याय निवडताना कुठलेही केंद्र निवडता येते. त्यामुळे ज्या ठिकाणी लसींचा साठा शिल्लक आहे, तेथील पर्याय निवडून मुंबई, वसई, विरार या शहरी भागातील नागरिक मोठ्या संख्येने जव्हारला नोंदी करून येथे येणे सुरू केले. मात्र सोमवारी झालेल्या गोंधळामुळे आता स्थानिक नागरिकही जागरूक झाले असून, मंगळवारी सकाळी दोन तास लसीकरण करण्यात आले. वेळेची मर्यादा संपल्यानंतर केंद्र बंद करण्यात आले. मंगळवारीही बाहेरगावाहून नागरिक मोठ्या संख्येने आले होते, मात्र वेळ निघून गेल्यामुळे त्यांना माघारी जावे लागले.
दरम्यान, लसींच्या साठ्यानुसार सेशन उपलब्ध करून दिले जातात. लसींचा उपलब्धतेनुसार दिवसात फक्त दोन तास लसीकरण पर्याय उपलब्ध होतो. त्यानुसार सकाळी दोन तास केंद्र सुरू होते. त्यात जास्तीत-जास्त स्थानिकांनी लसीकरण करण्यात आले असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. मराड यांनी दिली. मंगळवारी सकाळी ९ ते ११ या दोन तासांकरिता लसीकरण करण्याचा पर्याय उपलब्ध होता. त्यात मोठ्या संख्येने स्थानिक लोकांनी लसीकरण करून घेतले आहे. केंद्र सुरळीत सुरू करण्यात आलेले आहे, अशी माहिती जव्हारचे उपविभागीय अधिकारी संदीप पवार यांनी दिली.
दरम्यान, तालुक्याबाहेरील लोकांनी सोमवारी जव्हार येथील लसीकरण केंद्रावर मोठी गर्दी केली होती. वसई, विरारसह अन्य भागातील लोक जव्हारला लसीकरणासाठी पोहोचले होते. स्थानिकांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर तेथे मोठा गोंधळ उडाला होता. त्यामुळे पोलिसांनाही बोलवावे लागले होते. मंगळवारीही काही लोक बाहेरून आले होते. परंतु केवळ दोन तासच लसीकरण झाल्याने त्यांनाही निराश मनाने मागे परतावे लागले.
वसईतील लसीकरण केंद्रांत झुंबड
nवसई : वसई-विरार महापालिका हद्दीत १८ ते ४४
वयोगटातील नागरिकांसाठी दोनच लसीकरण केंद्रे असल्याने या केंद्रांवर मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. दरम्यान, १ मे पासून ४ मेपर्यंत एकूण ६९५ लाभार्थ्यांचे लसीकरण पूर्ण झाल्याची माहिती पालिकेचे जनसंपर्क अधिकारी गणेश पाटील यांनी ‘लोकमत’ला दिली.
nवसई-विरारमधील दोन केंद्रांवर १ मे रोजी १८ ते ४४ वयोगटातील एकूण १३८ लाभार्थ्यांना लसीकरण
करण्यात आले, तर २ मे ला सुट्टी असल्याने
लसीकरण झाले नाही.
n ३ मे रोजी सोमवारी उशिरापर्यंत वसई डी.एम. पेटिट पालिका रुग्णालयात व विरार बोळिंज केंद्रात ५५७ जणांचे लसीकरण करण्यात आले. मागील तीन दिवसांत वसईत पालिका प्रशासनाने ६९५ लाभार्थ्यांचे लसीकरण केले. वसईत दोनच केंद्रे असल्यामुळे मोठी गर्दी होत आहे.