फटाक्यांची दुकाने सजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2018 10:54 PM2018-11-01T22:54:40+5:302018-11-01T22:55:00+5:30
फॅन्सी फटाके अॅटमची धुम; इतर शहरांपेक्षा कमी दराने
- वसंत भोईर
वाडा : ठाणे, रायगड, नाशिक या जिल्ह्यातील प्रत्येक शहरांमध्ये फटाक्यांचे घाऊक व किरकोळ विक्रेते असतातच मात्र वाडा शहरातील फटाके व्यापा-यांकडे विक्रेत्यांचा ओढा असतोे. वाजवी दर असल्यामुळे व्यापा-यांचा ओढा वाड्याकडे आहे. थेट कारखान्यातून येथे माल येत असल्याचे इतर शहरांपेक्षा कमी दराने फटाके मिळतात असे व्यापारी व ग्राहकांचे म्हणणे आहे. येथील फटाक्यांच्या व्यापाऱ्यांनी वाड्याला एक नवी ओळख करून दिली आहे.
पूर्वी फटाक्यांचा धंदा हा दिवाळी सणापुरताच मर्यादित होता.मात्र आता हा धंदा बारमाही झाला आहे. विविध सण, लग्न समारंभ, विविध राजकीय पक्षांच्या सभा, निवडणूका, नागरिकांचे विविध कार्यक्रम अशा प्रत्येक वेळी फटाक्यांची गरज असल्याने हा धंदा आता बारमाही झाला आहे. दिवाळी साठी फटाक्यांची दुकाने सजली असून यावर्षी फॅन्सी अॅटमची धूम आहे.
दिवाळी सण हा चार दिवसांवर येऊन ठेपला असल्याने फटाके विक्र ेते व किरकोळ ग्राहक यांनी खरेदीसाठी एकच गर्दी केली आहे. तामिळनाडूतील शिवा काशी येथे फटाक्यांचे उत्पादन केले जाते. येथून थेट फटाक्यांच्या माल वाड्यात आणला जातो. येथील सर्वात प्रमुख व्यापारी म्हणून दिलीप ट्रेडर्स ची गणना केली जाते. दिलीप ट्रेडर्स हे वाड्यातील सर्वात मोठे व्यापारी. त्यांचे सर्व कुटुंब या व्यवसायात असून इतर २५ ते ३० कामगार असून सकाळी ८ ते रात्री पर्यंत हे दुकान दिवाळी च्या हंगामात सुरू असते. या खालोखाल प्रितम ट्रेडर्स हे व्यापारी आहेत. गणपती पासून दिवाळीच्या दहा दिवस अगोदर पर्यंत घाऊक विक्र ेत्यांची गर्दी असते. त्यानंतर किरकोळ विक्रेते व ग्राहक फटाके खरेदी करतात अशी माहिती व्यापा-यांनी दिली. प्रितम सेल्स एजन्सी, सिद्धिविनायक ट्रेडर्स, प्रसाद ट्रेडर्स, नंदकुमार ट्रेडर्स ही घाऊक फटाक्यांची दुकाने दिवाळीच्या वेळेस दिवस रात्र सुरू असतात. दिवाळीत करोडोचा व्यवसाय होत आहे. वाहतूक खर्च, कच्च्या मालाच्या भावात वाढ, मजुरीचे वाढलेले दर व इंधनाच्या दरातील वाढ यामुळे फटाक्यांच्या किंमतीत वाढ झाली असल्याचे व्यापा-यांनी सांगितले.
सुतळी बॉम्ब, फुलबाजा, अॅटम बॉम्ब, जमीन चक्र , अनार, लवंगी फटाकडी इत्यादी प्रकारही ग्राहकांना परवडणारे असून ते मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. मल्टी शॉट, १२० शॉट, २४० शॉट याची किंमत २०० पासून १५०० पर्यंत, फुलबाजा ५ रूपयापासून २५० पर्यंत हजाराची माल २०० पासून ५०० पर्यंत अशा किंमती आहे.
फॅन्सी आयटेमला मागणी
सध्या फॅन्सी अॅटमला मागणी जास्त असून त्याचीच धूम आहे. फॅन्सी अॅटमची किंमत ५० रूपयापासून ५००० रूपयापर्यत आहे .यामध्ये फोटो फ्लॅश, जेट फाऊंटन, कलर गोळी, वंडर लाईट, स्वस्तीक व्हील, लाईटींग थंडर, मल्टी शॉट, मल्टी बार, रॉबेट, डान्सिंग, पॅराशुट, कलर बॉल, स्कॉचवे, हॅण्ड्रेड शॉट आदी रंगीबेरंगी फटाक्यांना मागणी आहे.