वाडा येथील फटाक्यांची दुकाने हाऊसफुल्ल
By admin | Published: November 4, 2015 12:21 AM2015-11-04T00:21:34+5:302015-11-04T00:21:34+5:30
जिल्ह्यातील प्रत्येक शहरामध्ये घाऊक व किरकोळ विक्रेते असतानाही वाडा शहरातील स्वस्त फटाके घेण्याचा व्यापाऱ्यांचा कल अधिक असल्याचे आढळून आलेले आहे. दिवाळी हा सण
वाडा : जिल्ह्यातील प्रत्येक शहरामध्ये घाऊक व किरकोळ विक्रेते असतानाही वाडा शहरातील स्वस्त फटाके घेण्याचा व्यापाऱ्यांचा कल अधिक असल्याचे आढळून आलेले आहे. दिवाळी हा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. तरी मंदीचे सावट असल्यामुळे दरवर्षी प्रमाणे या वर्षी गर्दी कमी दिसते. परंतु वाड्याला फटाके स्वस्त मिळत असल्याने किरकोळ व घाऊक विक्रेते या ठिकाणी येऊन फटाके खरेदी करतात. मोठ्या प्रमाणात हा व्यवसाय येथे चालत असून वर्षभरात ५०० कोटींहुन अधिक रू. चा व्यवसाय होत असल्याचे जाणकारांचे मत आहे.
पालघर व ठाणे जिल्'ातील घाऊक व किरकोळ फटाके विक्रेत्यांसह बोरीवली, पनवेल, उरण, रायगड, रत्नागिरी, नाशिक या जिल्ह्यांत फटाके विक्रेते असूनही विक्रेते वाड्याकडे धाव घेऊन फटाक्यांची खरेदी करतात. पूर्वी फटाक्यांची दिवाळीलाच विक्री व्हायची मात्र आता हा धंदा बारमाही झाला असल्याचे वाड्यातील व्यापारी दिलीप पातकर यांनी सांगितले.
वाडा शहरापासून १ कि. मी. अंतरावर असलेल्या देसई नाक्यावरील दुकाने ठाणे, पालघर जिल्ह्यांतच नव्हे तर आजुबाजूच्या शहरातील फटाक्यासाठी प्रसिद्ध आहे. या दुकानांत साधारणपणे २०० कामगार कार्यरत आहेत. उत्तर प्रदेशातील शिवकाशी येथे फटाक्यांचे उत्पादन केले जाते. तेथून संपूर्ण फटाक्यांचा माल वाड्यात आणला जातो. गेल्यावर्षाच्या भावापेक्षा या वर्षी फटाक्यांचा भाव १० ते १५ टक्क्यांनी अधिक वाढला आहे. अशी माहिती येथील फटाके विक्रेत्यांनी दिली. सध्या फॅन्सी अॅटमची मागणी जास्त आहे. फॅन्सी अॅटमची ५० रू. पासून ५००० रू. पर्यंत आहे. यामध्ये फोटो फ्लॅश, जेट फाऊंटन, कलरगोळी, वंडर लाईट, स्वस्तिक व्हील, लायटींग थंडर, मल्टीशॉट, मल्टीबार, रॉबिट डान्सिंग, पॅराशुट, कलर बॉल, स्कॉचवे, हंट्रेड शॉट आदी आकाशातील रंगीबेरंगी फटाके यांना जास्त मागणी आहे. तसेच सुतळी बॉम्ब, फुलबाजा, अॅटम बॉम्ब, जमीन चक्र, अनार, लवंगी, फटाकडी, इ. प्रकारही ग्राहकांना परवडणारे असून ते मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत.
मल्टीशॉट ६० शॉट, १२० शॉट, २४० शॉट यांची किंमत ४०० रू. पासून १००० रू. पर्यंत आहे. फुलबाजे पाच रू. पासून २५० रू. पर्यंत हजारांची माळ २०० पासून ५०० रू. पर्यंत अशा किमती आहेत.
येथे येणारे बहुतांश ग्राहक हे घाऊक फटाके विक्रेते आहेत. किरकोळ ग्राहक हे दिवाळी सणाच्या पाच ते सात दिवस अगोदर येवून फटाके खरेदी करतात. या दिवसात फटाक्यांची अनेक दुकाने रात्रंदिवस सुरू असतात.