पालघर जिल्ह्यात ट्रिपल तलाकचा पहिला गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2018 04:51 AM2018-10-26T04:51:35+5:302018-10-26T04:51:38+5:30
वीस वर्षांचा संसार, पदरात तीन मुले आणि उतारवयात पतीने दिलेला तलाक तिला हादरवून गेला.
मनोर : वीस वर्षांचा संसार, पदरात तीन मुले आणि उतारवयात पतीने दिलेला तलाक तिला हादरवून गेला. मनोर येथील त्या पीडित महिलेला वीस वर्षांनंतर तिचा पती, वकील आणि आणखी दोघांनी संगनमत करून रविवारी बेकायदेशीररीत्या तलाकची नोटीस पाठवली.
त्यातील मुद्दे खोटे असल्याने तिने या चौघांविरोधात मंगळवारी मनोर पोलीसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी ट्रिपल तलाकचा गुन्हा दाखल केला आहे. पालघर जिल्ह्यातील हा पहिलाच गुन्हा आहे.
या महिलेचे वीस वर्षांपूर्वी वसई येथे लग्न झाले होते. ती काही दिवसांपूर्वी मुलांसह मनोरला माहेरी आली होती. तेथे तिला पतीकडून वकिलाकरवी तलाकची नोटीस आली. पतीसोबत कोणतेही भांडण नसताना त्याने ही नोटीस पाठवल्याचे तिचे म्हणणे आहे. याबाबतची तक्रार देत पती व वकिलाविरोधात तिने फिर्याद दिली आहे. आरोपींना अटक होईल, असे मनोर पोलीस ठाण्याचे स. पो. नि. जायभाये यांनी सांगितले.