प्रचाराची पहिली फेरी पूर्ण
By admin | Published: June 8, 2015 04:36 AM2015-06-08T04:36:42+5:302015-06-08T04:36:42+5:30
रविवार साप्ताहिक सुट्टीचा दिवस असल्याने उमेदवारांनी सकाळपासूनच प्रचाराला सुरूवात करीत सुट्टीचा पुरेपूर फायदा घेतला.
दीपक मोहीते, वसई
रविवार साप्ताहिक सुट्टीचा दिवस असल्याने उमेदवारांनी सकाळपासूनच प्रचाराला सुरूवात करीत सुट्टीचा पुरेपूर फायदा घेतला. दररोज दुपारी १ ते ४ दरम्यान विश्रांती घेणारे उमेदवार दुपारी देखील प्रचार करीत होते.
मतदानापूर्वीचा हा रविवार उमेदवारांना महत्त्वाचा होता. पुढील रविवारी मतदान होणार आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी दिवसभर प्रचारावर लक्ष केंद्रीत केले. प्रचारादरम्यान विरोधी पक्ष व सत्ताधाऱ्यांमध्ये चांगलाच कलगीतुरा रंगत आहे. सेनेच्या वरिष्ठ नेत्यांच्या टीकेनंतर बविआच्या कार्यकर्त्यांनीही आता जोरदार मोहीम उघडली आहे. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे.
२ जूनला प्रचारास प्रारंभ झाला. गेल्या ६ दिवसांमध्ये बविआ, सेना-भाजपा युती या दोन प्रमुख पक्षांच्या उमेदवारांनी प्रचाराची पहिली फेरी पूर्ण केली आहे. तर, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचाराचा मागमूसही दिसत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसची पडझड सुरूच असून येत्या दोन दिवसात काही कार्यकर्ते बविआच्या गोटात सहभागी होण्याच्या तयारीत आहेत. दोन दिवसापूर्वी वाळे गावांतील अनेक कार्यकर्त्यांनी बविआमध्ये प्रवेश केला.
युतीने पहिली जाहीर सभा घेण्यासंदर्भात प्रथम क्रमांक पटकावला. लवकरच बविआतर्फे माणिकपूर क्रिकेट ग्राऊंडवर जाहीर सभेचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यावेळी विविध पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते बविआमध्ये प्रवेश करणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. प्रत्येक पक्षांमध्ये उमेदवारी देण्यावरून झालेली नाराजी दूर करण्यासाठी वरिष्ठ नेत्यांना अपयश आले आहे. आपल्या नातेवाईकांना (विशेष करून पत्नी) रिंगणात उतरवून स्वत: भूमिगत होण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात घडले आहेत. काही पदाधिकारी व कार्यकत्यांनी पर्यटनाला जाणे पसंत केले आहे. तिकीट वाटपपूर्ण झाल्यानंतर पहिले दोन दिवस नाराजी असलेल्या इच्छूक उमेदवारांची समजूत काढण्यात गेले. त्यानंतर प्रत्यक्ष प्रचाराला सुरूवात झाली. तेव्हा नाराज अचानक भूमिगत झाले. त्यामुळे अधिकृत उमेदवारांची डोकेदुखी वाढली आहे.
गृहनिर्माण संस्थेच्या अध्यक्ष, सचिवांना साकडे
४दिवसभर प्रचार केल्यानंतर रात्री मुख्य कार्यालयात दुसऱ्या दिवसाच्या प्रचाराची रणनीती आखली जात आहे. दररोज सुमारे ५०० ते ६०० मतदारांना गाठण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले असून त्यानुसार वेगवेगळे गट स्थापन करून माहिती पत्रके, पक्षाची चिन्हे आदी साहित्याचे वाटप केले जात आहेत.
४उपप्रदेशातील ढगाळ वातावरण लक्षात घेता येत्या दोन ते तीन दिवसामध्ये पावसाचे आगमन होण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास प्रचारामध्ये अडथळे निर्माण होऊन उमेदवारांना प्रचार करणे कठीण होणार आहे. गृहनिर्माण संस्थाच्या अध्यक्ष व सचिवांची भेट घेऊन संस्थेतील सदस्यांना मतदान करण्यासाठी आपले वजन वापरा, असे साकडे घालण्यात येत आहेत.
४प्रचाराच्या दोन फेऱ्या पूर्ण झाल्यानंतर मतदारांना आपलेसे करण्यासाठी राजकीय पक्षांकडून विविध क्लृप्त्या वापरल्या जाणार आहेत. मंदिर, विवाह सोहळ्यामध्ये उमेदवार हजर होत आहे. १२ जून रोजी सायंकाळी ५ वाजता निवडणुकीचा प्रचार थांबणार आहे. त्यानंतर आप्त, मित्र परिवार यांच्यामार्फत मतदारांना गाठण्याचा कार्यक्रम सुरू होणार आहे.