काेराेना विषाणूच्या पहिल्या लाटेत ज्येष्ठ नागरिक लक्ष्य, पुरुषांच्या मृत्यूचे प्रमाण जास्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 12:19 AM2020-12-26T00:19:43+5:302020-12-26T00:20:02+5:30
coronavirus news : नोव्हेंबरपर्यंत जिल्ह्यात कोरोनाने झालेले मृत्यू ० ते २० वयोगटातील एक तरुण आणि एक तरुणी असे दोन मृत्यू झाले असून २० ते ३० वयोगटातील १० रुग्णांचा मृत्यू झाला असून त्यात सहा तरुण आणि चार तरुणींचा समावेश आहे.
- हितेन नाईक
पालघर : मार्च महिन्यापासून जिल्ह्यात कोरोनाच्या प्रादुर्भावाने ग्रामीण भागातील एकूण ३०१ मृत्यूंपैकी सर्वाधिक १४९ मृत्यू पालघर तालुक्यात झाले असून त्यातील १३० मृत्यू हे ६१ वर्षे वयोगटापुढील व्यक्तींचे आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात जानेवारी-फेब्रुवारी महिन्यांत कोरोना व्हायरसच्या संसर्गाची दुसरी लाट येण्याची शक्यता आरोग्य विभागाने वर्तविल्याने ६१ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना प्रत्येक कुटुंबीयांनी आता जपावे लागणार आहे.
नोव्हेंबरपर्यंत जिल्ह्यात कोरोनाने झालेले मृत्यू ० ते २० वयोगटातील एक तरुण आणि एक तरुणी असे दोन मृत्यू झाले असून २० ते ३० वयोगटातील १० रुग्णांचा मृत्यू झाला असून त्यात सहा तरुण आणि चार तरुणींचा समावेश आहे.
३१ ते ४० वयोगटापैकी ३२ रुग्णांचा मृत्यू झाला असून त्यात २२ पुरुष, तर १० स्त्रियांचा समावेश आहे. ४१ ते ५० वयोगटातील ३८ रुग्णांचा मृत्यू झाला असून त्यातील ३२ पुरुष, तर सहा महिलांचा समावेश आहे.
जिल्ह्यात कोरोनाने झालेले मृत्यू
५१ ते ६० वयोगटातील ८९ ज्येष्ठांचा मृत्यू झाला असून त्यात ६७ पुरुष व २२ महिलांचा समावेश आहे. तर, ६१ वर्षांवरील वयोगटात सर्वाधिक १३० मृत्यू झाले असून ८६ पुरुष, तर ४४ महिलांचा समावेश आहे. मृत्यूच्या नोंदीत २१५ पुरुष, तर ८६ महिलांचा समावेश असून एकूण ३०१ रुग्णांचे मृत्यू पालघर, डहाणू, तलासरी, विक्रमगड, जव्हार, मोखाडा, वाडा व वसई (ग्रामीण) मधील आहेत.
१०० सप्टेंबरमध्ये मृत्युमुखी
पालघर जिल्ह्यामध्ये कोरोना महामारीमुळे सर्वाधिक मृत्यूच्या घटना या सप्टेंबर महिन्यामध्ये (१०० मृत्यू) घडल्या आहेत. कोरोना प्रादुभावाच्या सुरुवातीच्या काळात म्हणजेच मार्चमध्ये १ मृत्यू, एप्रिलमध्ये २, मे महिन्यात १ मृत्यू, जूनमध्ये १४, जुलैमध्ये ३३, ऑगस्टमध्ये ९६, सप्टेंबर १००, तर ऑक्टोबरमध्ये ३९ रुग्णांचे मृत्यू झाल्याची नोंद करण्यात
आली आहे.