नव्या बाजारात मासळी विक्रेत्यांनाही घ्यावे; सरनाईक यांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2018 11:59 PM2018-08-22T23:59:50+5:302018-08-23T00:00:25+5:30
सत्ताधाऱ्यांकडून मर्जीतील व्यापाºयांचा समावेश होत असल्याचा केला आरोप
मीरा रोड : मीरा-भार्इंदर महापालिकेने मीरा रोड मध्ये नव्याने सुरू केलेल्या बाजारात भाजपा नगरसेवकांनी प्रशासनाला कोणतीही माहिती न देता परस्पर मर्जीतील केवळ भाजी व फळ विक्रेत्यांचा भरणा केला आहे. या बाजारात पालिकेने मासळी तसेच मटन विक्रेत्यांनाही सामावून घ्यावे, अशी मागणी आमदार प्रताप सरनाईक यांनी आयुक्त बालाजी खतगावकर यांच्याकडे केली आहे. तसे न झाल्यास शिवसेना रस्त्यावर उतरेल, असा इशारा दिला आहे.
पालिकेने रामदेव पार्क व हाटकेश परिसरात नव्याने शेड बांधली आहे. या बाजारात परिसरातील सिनेमॅक्स पासूनच्या फेरीवाल्यांना सामावून घेण्याचा निर्णय झाला असला तरी त्याचे धोरण अद्याप ठरलेले नाही. अशातच भाजपा नगरसेवकांनी केवळ फळ व भाजी विक्रेत्यांना सामावून घेण्यास सुरूवात केली आहे. यात परप्रांतीय फेरीवाल्यांचा भरणा अधिक असून अनेक वर्षापासून व्यवसाय करणाºया स्थानिक फेरीवाल्यांना मात्र बाजारात सामावून घेतलेले नाही. तसेच मूळ स्थानिक मासळी व मटन विक्रेत्यांना सामावलेले नाही. तेथील बाजार फी वसुलीचा दर निश्चित नाही. तरीही बाजारातील एका फेरीवाल्याकडून तब्बल ८० ते १०० रुपये फी रोज घेतली जाते.
या बाजाराव्यतिरीक्त इतर ठिकाणी व्यवसाय करणाºया फेरीवाल्यांकडून ३० ते ५० रुपये फी वसूल केली जाते. यावरून नवीन बाजारातील फेरीवाल्यांना दिल्या जाणाºया बाजार फीच्या पावत्या बनावट असल्याचा आरोप फेरीवाला संघटनांनी केला आहे.
पालिकेने फेरीवाला पुर्नवसनाचे धोरण तसेच त्यांचे सर्वेक्षण पूर्ण केलेले नसताना भाजपा नगरसेवकांनी सुरु केलेला उपद्व्याप आक्षेपार्ह असल्याचा आरोप सरनाईक यांनी केला आहे.
फेरीवाल्यांवर अन्याय होणार नाही
जनवादी हॉकर्स सभेचे स्थानिक अध्यक्ष अॅड. किशोर सामंत यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी आयुक्त दालनाबाहेर ठिय्या आंदोलन केले. त्यावेळी आयुक्तांनी शिष्टमंडळासोबत केलेल्या चर्चेत अद्याप फेरीवाल्यांचे सर्वेक्षण पूर्ण झाले नसल्याचे स्पष्ट करत अधिकृत फेरीवाल्यांवर अन्याय होऊ देणार नसल्याची ग्वाही दिली.