मच्छीमार बोटीला जहाजाची बसली धडक, १६ जण बचावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2019 01:56 AM2019-10-06T01:56:57+5:302019-10-06T01:58:28+5:30
मुरबे येथील सुनील तरे यांच्यासह १२ मच्छीमारांनी कर्जे काढून तर काहींनी आपल्या घरातील सोन्याचे दागिने बँकेत गहाण ठेऊन एक बोट बांधली.
पालघर : अरबी समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या मुरब्याच्या ‘आई एकवीरा’ या बोटीतील १६ मच्छीमार जाळी समुद्रात टाकून झोपले असताना शनिवारी पहाटे साडेतीन वाजता एका मोठ्या जहाजाने दिलेल्या धडकेमुळे ती बोट शेकडो फूट फरफटत गेली. या बोटीचे नुकसान झाले असून सुदैवाने १६ मच्छीमार बचावले आहेत.
मुरबे येथील सुनील तरे यांच्यासह १२ मच्छीमारांनी कर्जे काढून तर काहींनी आपल्या घरातील सोन्याचे दागिने बँकेत गहाण ठेऊन एक बोट बांधली. मोठ्या आनंदाने मच्छीमारांचे कुलदैवत असलेल्या ‘आई एकविरा’ असे नाव बोटीला देऊन त्यांनी मासेमारीला सुरूवातही केली होती. २ आॅक्टोबर रोजी सर्व मच्छिमार आपली बोट घेऊन मच्छीमारीला निघाले. बोट खोल समुद्रात ३० नॉटिकल समुद्री मैलावर असलेल्या आपल्या कवी जवळ पोहचल्यावर त्यांनी आपल्या बोटीतील जाळी मांडून तीन बल्ब लाऊन ते झोपले.
पहाटे ते साखर झोपेत असताना त्यांच्या बोटीला धडक बसल्याने सर्व खडबडून जागे झाले. त्यांनी बाहेर पाहिले असता आपल्या बोटीच्या अँकरला लावलेला दोरखंड त्या मोठ्या जहाजाला अडकून ती बोट फरफटत जात असल्याने सर्व घाबरून बोटीत एकच गोंधळ उडाला. मात्र सुदैवाने जहाजाला अडकलेला दोरखंड तुटल्याने बोट जहाजपासून वेगळी झाली. या घटनेत बोटीचे मोठे नुकसान झाल्याचे सुनील तरे यांनी ‘लोकमत’ला सांगितले. वाढवण बंदर झाल्यास मोठ्या जहाजांची वाहतूक वाढून मच्छीमारांना याचा त्रास सहन करावा लागले असे बोलले जात आहे.
खोल समुद्रातून ये-जा करताना मोठ्या जहाजाने आपल्या मार्गात येणाऱ्या लहान जहाजांना बाजूला होण्यासाठी हॉर्न वाजवून बाजूला होण्याचा इशारा द्यायचा असतो. परंतु ‘आई एकविरा’ बोटीला तीन बल्ब लावलेले असतानाही आम्हाला कुठलाही इशारा न देता आमच्या बोटीला धडक मारून ते जहाज निघून गेले. त्या जहाजाला अडकलेला दोरखंड तुटला नसता तर आम्ही सर्व १६ जण बोटीसह त्या जहाजाच्या खाली सापडून मृत्युमुखी पडलो असतो.
- सुनील तरे, बोट मालक.
वाढवण बंदर झाल्यास मोठ्या बोटीची ये-जा वाढणार असून मच्छीमार बोटींना धोका वाढणार आहे.
- राजन तरे, सामाजिक कार्यकर्ते, मुरबे