घोडा माशाला दिले मच्छीमाराने जीवदान
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2019 12:35 AM2019-06-28T00:35:51+5:302019-06-28T00:36:17+5:30
जगातील एकमेव जन्मदाता म्हणून ओळखला जाणारा नर प्रजातीचा दुर्मिळ असा घोडा मासा दांडीच्या समुद्रात तडफडत्या स्थितीत मितेश धनू या मच्छीमाराला आढळून आला
- हितेन नाईक
पालघर - जगातील एकमेव जन्मदाता म्हणून ओळखला जाणारा नर प्रजातीचा दुर्मिळ असा घोडा मासा दांडीच्या समुद्रात तडफडत्या स्थितीत मितेश धनू या मच्छीमाराला आढळून आला . त्यांनी अत्यंत काळजीपूर्वक अशी त्याची देखभाल मागील दोन दिवसांपासून ठेवली असून त्याला पहायला अनेक लोक येत आहेत.
समुद्री घोडा हा अत्यंत दुर्मिळ मत्स्यजाती म्हणून ओळखली जाते. निसर्गाने आई होण्याचे वरदान फक्त मादी प्रजातीच्या प्राण्यांना दिले आहे. परंतु, जगात सर्व प्राणी, पशु-पक्षामध्ये अपवादात्मक बाब म्हणून समुद्रातील घोडा (सी हॉर्स) फिश या प्रजातीमधील नर मासा पिल्लांना जन्म देत असल्याचे दिसून आले आहे. मादीशी प्रजनन केल्यानंतर नर माशाच्या पोटाला कांगारूप्रमाणे असणाऱ्या पिशवीत ही अंडी तयार होतात. ४५ दिवसांनी या अंड्यातून शेकडो पिल्ले बाहेर पडतात.
घोड्याच्या डोक्याशी मिळता जुळता डोक्याचा भाग या माशाला असल्याने घोडा मासा म्हणून तो सर्वत्र ओळखला जात असून त्याचे शरीर टणक, चिकट तर शेपटी नागासारखी निमूळती असल्याने समुद्रातील झाडांना आपल्या शेपटीचा विळखा घेत हा मासा चिटकून राहतो. या माशाच्या १०० प्रजाती असून लाल अथवा पिवळा-पांढ-या रंगात तो या भागात आढळतो. या माशाची लांबी २.५ सेंटीमीटर्स ते एक फुटापर्यंत असते. या माशाच्या धडाला दोन पंख असल्याने त्या पंखाच्या सहाय्याने ते समुद्रात मार्गक्रमण करीत असतात. समुद्री घोडे उष्ण आणि समशीतोष्ण उथळ पाण्यातील खडक, प्रवाळ असेल अशाच भागात जास्त प्रमाणात आढळून येतात. आपल्या जवळून जाणा-या कवचधारी जलचर, लहान मासे, शिंपले यांना आपल्या चोच रुपी तोंडाने खेचून तो त्यांना पकडतो.
मंगळवारी मितेश धनू हे समुद्रावर गेले असताना हा मासा कमी पाण्याची खोली असल्याने पोहण्यासाठी आटापिटा करीत होता. समुद्राचे पाणी दूरवर असल्याने त्यांनी एका प्लास्टिक पिशवीत समुद्राचे पाणी घेऊन त्या माशाला घरी आणले. या संदर्भात त्यांनी स्थानिक पोलीस, वन विभाग यांना कल्पना दिल्यानंतर गुरुवारी त्या माशाला वनविभागच्या माध्यमातून वाईल्ड लाईफ कंझर्व्हेशन अॅण्ड अॅनिमल असोसिएशन डहाणू यांच्याकडे सुपूर्द करण्यात येईल. किंवा पुन्हा समुद्रात सोडले जाईल.