मच्छीमार सचिन तांडेलचा आंतरराष्ट्रीय क्रीडा पराक्रम, जिद्दीने केली दिव्यांगत्व व आर्थिक विवंचनेवर मात
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2019 01:09 AM2019-05-05T01:09:34+5:302019-05-05T01:11:14+5:30
श्रीलंकेत संपन्न झालेल्या तिसऱ्या एटीटीएफ आंतरराष्ट्रीय पॅरा कबड्डी स्पर्धेत भारताने बाजी मारली. त्यामध्ये डहाणू तालुक्यातील कबड्डीपटू सचिन हरिश्चंद्र तांडेल याने चमकदार कामिगरी केली.
- अनिरु द्ध पाटील
बोर्डी : श्रीलंकेत संपन्न झालेल्या तिसऱ्या एटीटीएफ आंतरराष्ट्रीय पॅरा कबड्डी स्पर्धेत भारताने बाजी मारली. त्यामध्ये डहाणू तालुक्यातील कबड्डीपटू सचिन हरिश्चंद्र तांडेल याने चमकदार कामिगरी केली. या राष्ट्रीय संघात खेळणारा तो राज्यातील एकमेव खेळाडू होता. दरम्यान आंतरराष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत खेळणारा पालघर जिल्ह्यातील तो पहिला खेळाडू ठरला आहे.
नरपड गावातील पंचवीस वर्षीय सचिन ला जन्मत:च पोलिओ झाल्याने, तो दिव्यांग असून डाव्या पायाला हे प्रमाण ४५ टक्के आहे. त्याला शालेय जीवनापासूनच कबड्डीची आवड असल्याने येथील अनंत जनार्दन म्हात्रे विद्यालयातील स्पर्धांमधून त्याने स्वत:ची चमक दाखवली. तर ओम साई कबड्डी संघातील सहकाऱ्यांच्या तालमीचा आणि नरपडच्या या संघाकडून त्याला कबड्डीचे बाळकडू मिळाले. येथ संपादिलेल्या उत्तम कौशल्य व क्रीडा नैपुण्याच्या कामिगरीने पहिल्यांदा जिल्हा, राज्य आणि त्यानंतर राष्ट्रीय दिव्यांग कबड्डी संघात त्याने स्थान मिळवले. नुकतेच त्याने श्रीलंकेतील पॅरा आंतरराष्ट्रीय स्पर्धेत चौफेर चढाया व अफलातून पकडीच्या जोरावर गुणांची कमाई करीत देशाला अंतिम विजय प्राप्त करून देताना महत्वाची कामिगरी पार पाडली.
कर्नाटक येथे पार पडलेल्या पहिल्या राष्ट्रीय दिव्यांग स्पर्धेत महाराष्ट्र संघात खेळतानाही त्याला सर्वोत्तम कबड्डीपटुच्या किताबाने सन्मानीत केले होते. त्या जोरावर राष्ट्रीय संघात त्याला स्थान मिळाले. त्याच्या या आंतरराष्ट्रीय कामिगरीने आशियाई स्पर्धेकरीताही त्याची निवड झाली आहे.
नरपड गावातील कोळी मांगेला समाजात त्याचा जन्म झाला असून त्याच्या लहानपणीच वडिलांचे छत्र हरपले. बिकट आर्थिक परिस्थितीवर मात करण्यासाठी तो स्पर्धा खेळून आल्यावरही समुद्रात मासेमारीला जातो. तर शिक्षण घेताना, मैदानही गाजवत होता. मात्र बिकट परिस्थितीत बीए पर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्याचे सांगतो.