'मेकुनु’मुळे मच्छीमारांना दुहेरी फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2018 21:41 IST2018-06-01T21:41:14+5:302018-06-01T21:41:14+5:30
वादळामुळे मासेमारीचे शेवटचे दिवस हातातून निसटल्याने आर्थिक फटका बसल्याने शेतकऱ्याप्रमाणोच आम्हालाही नुकसानभरपाई द्या.

'मेकुनु’मुळे मच्छीमारांना दुहेरी फटका
नव्या नियमामुळे शुक्रवार 1 जूनपासून मासेमारीचा हंगाम बंद होतो आहे. मात्र मेकुनु वादळामुळे उत्तन, पाली, चौक भागातील मच्छीमार बोटी 25 मे पासूनच किनाऱ्यावर परतावे लागल्याने त्यांच्यावर हंगामाच्या शेवटी रिकाम्या हाताने घरी बसण्याची वेळ यंदा आली. सध्या बोटी किनाऱ्याला लावण्यासाठी मच्छीमारांची धावपळ सुरू आहे. वादळामुळे मासेमारीचे शेवटचे दिवस हातातून निसटल्याने आर्थिक फटका बसल्याने शेतकऱ्याप्रमाणोच आम्हालाही नुकसानभरपाई द्या, अशी मागणी मच्छीमारांनी केली.
भाईंदरच्या उत्तन, पाली, चौक किनारपट्टीवरील कोळीवाडय़ांमध्ये मासेमारी करणाऱ्या बोटी आहेत. पावसाळ्यासाठी 1 जूनपासून सरकार मासेमारीवर बंदी घालते. ही बंदी दोन महिने असेल आणि 1 ऑगस्टपासून त्यावेळचे हवामान पाहून मासेमारी बोटी समुद्रात जातील.
1 जूनपासून मासेमारी बंदचा सरकारचा आदेश असला, तरी 23 ते 27 मे दरम्यानच्या मेकुनु वादळाच्या तडाख्यामुळे समुद्र खवळलेला होता. त्यामुळे हवामान खात्यासह मत्स्य विभागानेही मच्छीमारांना धोक्याचा इशारा दिला होता. परिणामी, हंगामातील शेवटची मासेमारी करण्यासाठी गेलेल्या मासेमारी बोटींना नाईलाजाने मागे फिरावे लागले. 31 मे ही मासेमारीची अंतिम मुदत असताना 25 मे पासूनच बोटी परतू लागल्या होत्या. चौक बंदर हे बोटी नांगरण्यासाठी सुरक्षित असल्याने बहुतांश बोटी याच बंदर परिसरात येतात. त्यामुळे सध्या येथे बोटी किनाऱ्याला खेचण्याचे काम मच्छीमारांनी सुरू केले आहे. ते एकत्र येऊन बोटी किनाऱ्याला ओढण्याचे काम करतातच पण सोबत क्रेनचीसुद्धा मदत घेतली जाते.
तीन वेळा फटका
मासेमारीच्या एकूणच हंगामात तीन वेळा वादळ व वादळी पावसामुळे मासेमारीला चांगलाच फटका बसला. शेवटच्या टप्प्यात चांगली मासळी मिळावी, अशी मच्छीमारांची आशा असते. परंतु मेकुनु वादळामुळे मासेमारी आधीच बंद करावी लागल्याने मच्छीमारांचे मोठे नुकसान झाल्याचे मच्छीमार संस्थेचे विल्यम गोविंद म्हणाले.
भरपाईपासून मच्छीमार वंचित
शेतकऱ्यांप्रमाणेच मच्छीमारांना नुकसानीची भरपाई मिळावी अशी सरकारकडे सतत मागणी करूनही न्याय मिळत नसल्याबद्दल विल्यम गोविंद यांनी नाराजी व्यक्त केली. बडय़ा उद्योजकांची हजारो कोटींची कर्ज माफ केली जातात. थकबाकीदार कोटय़वधी बुडवून परदेशात पळून जातात. पण मच्छीमारांना मात्र नुकसानभरपाईही मिळत नाही.