अर्नाळ्यातील मच्छीमारांचा उद्रेक; ४ दिवसांपासून वीज नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2019 11:26 PM2019-07-21T23:26:39+5:302019-07-21T23:26:54+5:30
५०० ते ६०० स्थानिकांचा अडीच तास रास्ता रोको
नालासोपारा : अर्नाळा गावात बुधवारपासून तब्बल ४ दिवस वीज नसल्याने बुधवारपासून चार दिवस वीज नसल्यामुळे स्थानिक ५०० ते ६०० मच्छिमारांनी रविवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास उत्स्फूर्तपणे रास्ता रोको केला. कायदा तसेच सुव्यवस्था बिघडू नये यासाठी अर्नाळा पोलीस घटनास्थळी पोलीस फौजफाट्यासह पोहोचले होते. महावितरणचे अधिकारी, इंजिनियर, कर्मचाऱ्यांनी वीज पूर्ववत करण्यासाठी रविवारी संध्याकाळपर्यंतचा वेळ मागितल्यावर स्थानिकांनी हे आंदोलन मागे घेतले असून रविवारी संध्याकाळपर्यंत वीज आली नाही, तर सोमवारी जे होईल त्याला राज्य शासन आणि महावितरण जबाबदार राहील असा सज्जड दमही देण्यात आला.
बुधवारपासून वीज खंडित झाल्याने अर्नाळा गावातील रहिवासी मेटाकुटीस आले होते. याचाच उद्रेक होऊन नागरिकांनी अर्नाळा गावातील मुख्य रस्त्यावर वीज कंपनीच्या भोंगळ कारभाराविरोधात आपला संताप व्यक्त केला. अधिकाऱ्यांच्या बेफिकिरीबाबत रस्ता अडवून निषेध व्यक्त केला आहे. वीज कार्यालयात तक्रार केल्यावर कधी फिडर फेल, कधी झंपर तर कधी ट्रान्स्फॉर्मर गेल्याची उत्तरे मिळतात. नेहमीच काही ना काही तांत्रिक बिघाड होत असल्याची कारणे वीज अधिकाºयांकडून मिळतात. विशेष म्हणजे, या गंभीर समस्येवर उपाय म्हणून या परिस्थितीत महावितरण कंपनीकडे कायम स्वरूपाची उपयोजना नाही. त्यातच येथील अधिकारी नागरिकांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करतात.
दरम्यान वीज गेल्यावर रात्रपाळीचे लाईनमन, कनिष्ठ अभियंता उपलब्ध नसतात, दूरध्वनीवर तक्र ारी दिल्या तरी त्याकडे दुर्लक्ष करतात मात्र अव्वाच्या सव्वा आलेली वीज बिले भरण्यासाठी मात्र, वीज अधिकारी नागरिकांच्या मागे तगादा लावतात अन्यथा वीज खंडित केली जाते. अशा नेहमीच्या त्रासाला कंटाळून अर्नाळा येथील मुख्य रस्त्यावर नागिकांनी मोर्चा काढून आंदोलन केले.
गेल्या ४ दिवसांपासून वीज नसल्याने ५०० ते ६०० मच्छीमार स्थानिकांनी अडीच तास रास्ता रोको केला होता. संध्याकाळ पर्यंतचा वीज पूर्वरत करण्यासाठी महावितरणच्या अधिकारी व इंजिनियर, कर्मचाºयांना वेळ दिला आहे. - राजू तांडेल (अध्यक्ष, मच्छिमार स्वराज समिती, अर्नाळा)
गावात विजेसाठी ट्रासफार्मर लावला होता पण तो बंद झाल्याने दुसरा ट्रान्सफार्मर लावला होता पण तोही बंद झाला आहे. पापडी येथून ३१५ केवी चा ट्रान्सफार्मर मागवला असून तो लावल्यावर वीज पूर्वरत होईल. ३ इंजिनियर आणि कर्मचारी सदर ठिकाणी हजर असून युद्धपातळीवर काम करून वीज पूर्वरत केली जाईल. - अनवर शेख (कनिष्ठ अभियंता, वसई)