मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा
By admin | Published: October 9, 2015 11:31 PM2015-10-09T23:31:50+5:302015-10-09T23:31:50+5:30
अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याची तीव्रता वाढणार असल्याने समुद्र खवळलेला राहणार असून मुसळधार पावसाची शक्यता पाहता कोकण किनारपट्टीवरच्या मच्छीमारांनी
पालघर : अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याची तीव्रता वाढणार असल्याने समुद्र खवळलेला राहणार असून मुसळधार पावसाची शक्यता पाहता कोकण किनारपट्टीवरच्या मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये, असा इशारा आपत्ती व्यवस्थापनाकडून देण्यात आला आहे. परंतु, पालघर जिल्ह्यातील २ ते ३ हजार मच्छीमार नौका अनेक दिवसांपासून खोल समुद्रात मासेमारीला गेल्या असल्याने किनारपट्टीवर चिंतेचे वातावरण पसरले आहे.
पालघर जिल्ह्यातील वसई, अर्नाळा, उत्तन, नायगाव, एडवण, केळवे, सातपाटी, वडराई, मुरबे, नवापूर, उच्छेळी-दांडी, डहाणू, बोर्डी इ. किनारपट्टीवरील गावांमधून सुमारे २ ते ३ हजार लहानमोठ्या नोका मच्छीमारीसाठी खोल समुद्रात गेल्या आहेत. या नौका नेहमीच मुंबई, जाफराबाद इ. भागांत ४० ते ५० सागरी मैलांपर्यंत माशांच्या थव्यांच्या शोधात जात असतात. सॅटेलाइटद्वारे मिळालेल्या चित्राद्वारे कमी दाबाचा पट्टा हा गोवा आणि मुंबईच्या मध्यभागाकडे सरकत असून पश्चिम व दक्षिण दिशेने ४१० किमी गोव्याचे दिशेने तर मुंबईपासून ६१० किमी अंतरावर हा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. येत्या २४ तासांमध्ये त्याची तीव्रता वाढण्याची शक्यता असून समुद्र खवळलेला राहून मुसळधार पाऊसही कोसळणार आहे. त्यामुळे मच्छीमारांनी समुद्रात मासेमारीला जाऊ नये, असा इशारा जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी दिला आहे. या इशाऱ्यानंतर सातपाटी येथील सर्वोदय सहकारी संस्था व मच्छीमार सहकारी संस्थेच्या वतीने समुद्रातील आपापल्या बोटींना वायरलेस सेटद्वारे सूचना देण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे सर्वोदयचे चेअरमन सुरेश म्हात्रे यांनी लोकमतला सांगितले. परंतु, वातावरणातील बदलामुळे वायरलेस सेटवरून अनेक बोटींचा संपर्क होऊ शकत नसल्याचेही ते म्हणाले. (वार्ताहर)