मच्छीमारच पापलेट वाचवणार
By admin | Published: May 8, 2016 02:55 AM2016-05-08T02:55:25+5:302016-05-08T02:55:25+5:30
सातपाटी, मुरबे येथील मच्छिमारांकडून पापलेटच्या पिल्लांची चाललेली बेसुमार मासेमारी (कत्तल) रोखण्यास मत्स्य व्यवसाय विभाग हतबल ठरला असतांना सातपाटीमधील दोन्ही
- हितेन नाईक, पालघर
सातपाटी, मुरबे येथील मच्छिमारांकडून पापलेटच्या पिल्लांची चाललेली बेसुमार मासेमारी (कत्तल) रोखण्यास मत्स्य व्यवसाय विभाग हतबल ठरला असतांना सातपाटीमधील दोन्ही प्रमुख मच्छिमार सहकारी संस्थांनी एकमुखी निर्णय घेत लहान पापलेट आपल्या शीतगृहात न ठेवण्याचा व बोटी धारक, तसेच व्यापाऱ्यांना बर्फ न देण्याचा निर्णय घेतला आहे.
पापलेट मासा हा मच्छिमारांना अधिक आर्थिक उत्पन्न देणारा म्हणून सर्वत्र ओळखला जात असून सातपाटी, मुरबे, डहाणू, अर्नाळा, वसई, उत्तन, नायगाव आदी हजारो मच्छिमार नौकाधारकांचा आर्थिकस्तर उंचावण्याच्या दृष्टीने या माशांचा मोठा वाटा आहे. परंतु मागील १२ ते १५ वर्षांपासून एप्रिल ते मे महिन्यात जन्माला येणाऱ्या लहान पापलेटच्या पिल्लांची कत्तल मच्छिमारांकडून मोठ्या प्रमाणात केली जात असल्याने पापलेटच्या उत्पादनाची मोठी घसरण सुरु आहे.
या लहान पिल्लांची मासेमारी करणाऱ्यांवर अंकुश ठेवण्यासाठी कायद्यात तरतूद नसल्याने काही मच्छिमार आपला स्वार्थ साधण्यासाठी बेसुमारपणे मासेमारी करीत आहेत. महाराष्ट्र मासेमारी नियम अधिनियमन १९८१ अन्वये कायद्यात या लहान माशांच्या पिल्लांची मासेमारी करणाऱ्यांना कायद्याच्या कक्षेत आणून शिक्षेची तरतूद करण्यासाठी मच्छिमार संघटनांनी चालविलेल्या प्रयत्नांना शासनाकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे ठाणे जिल्हा मच्छिमार संस्थेचे अध्यक्ष नारायण विंदे यांनी सांगितले. या अभिनव निर्णयामुळे पापलेटचे किती संवर्धन होते, ते लवकरच कळेल.
सातपाटी पापलेटची संख्या प्रचंड घटली
सातपाटी व मुरबे येथील काही मच्छिमार करप्याडोलीने मासेमारी करताना पापलेटच्या लहान पिल्लांची मासेमारी करीत असल्याने पापलेटची मोठी घसरण झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ३ लाख २३ हजार ९३३ किलो पापलेटचे उत्पादन कमी झाल्याचे दिसून आले आहे.
मच्छिमारांना आर्थिक सुबत्ता देणाऱ्या या माशाची संख्या प्रचंड घटली आहे ती वाढविण्यासाठी मस्त्यव्यवसाय विभागाकडून पावले उचलत नसल्याचे मच्छिमारांचे मत आहे. त्यामुळे सातपाटी मधील सातपाटी मच्छिमार सहकारी संस्था व सातपाटी सर्वोदय सहकारी संस्थेने लहान पापलेटच्या पिल्लांची मासेमारी करणाऱ्यावर कायदेशीर कारवाईबरोबर त्यांना बर्फ देण्यास बंदी घातली होती.
लहान पापलेटच्या खरेदी-विक्रीवर परिणाम होऊन दर घसरल्याने कव मासेमारी करणाऱ्या १५० ते २०० मच्छिमारांनी आज सर्वोदय सहकारी संस्थेत घुसून धुमाकूळ घातला. सुरेश म्हात्रे यांना घेराव घालून आमच्यावर निर्बंध लादण्याबरोबर उत्तन, वसई, अर्नाळा भागातील मच्छिमारांच्या मासेमारीचे काय? असा प्रश्न उपस्थित केला. त्यामुळे काही काळ वातावरण तंग बनले होते.