माझ्या विजयात मच्छीमारांचा वाटा - खासदार राजेंद्र गावित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2019 11:06 PM2019-06-05T23:06:56+5:302019-06-05T23:07:03+5:30
२१ तज्ज्ञांची समिती नेमणार : खासदार गावित यांची सत्कार सोहळ्यात घोषणा
पालघर : पालघर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत मला विजयी करण्यात मच्छीमार समाजाचा मोठा वाटा असून त्यांनी माझ्यावर दाखविलेल्या विश्वासाला मी कदापी तडा जाऊ देणार नाही अशी ग्वाही नवनिर्वाचित खासदार राजेंद्र गावित यांनी दिली.
त्यांचा सत्कार ठाणे जिल्हा मच्छीमार मध्यवर्ती संघ आणि ठाणे जिल्हा मच्छीमार संघाच्या संयुक्त विद्यमाने पालघर येथे आयोजित करण्यात आला होता.ह्यावेळी महाराष्ट्र राज्य संघाचे अध्यक्ष रामदास संधे, मच्छिमार संघाचे अध्यक्ष राजकुमार भाय, अशोक नाईक, राजन मेहेर, ज्योती मेहेर, सभापती अनुजा तरे, अशोक अंभिरे, मोरेश्वर वैती, गणेश तांडेल आदी मान्यवर उपस्थित होते.
पालघरवासीयांनी आजपर्यंत माझ्यावर केलेल्या प्रेमामुळेच पालघर लोकसभा मतदार संघासाठी माझ्या नावाची शिफारस झाली.मी आज पर्यंत मतदार संघात काम करताना कधीच जात, धर्म, व्यक्ती,पक्ष पहिला नाही,ज्याला ज्याला मदत करणे शक्य आहे, त्याना मदत करीत गेलो.त्यामुळेच पालघरवासीयांनी माझ्या झोळीत तब्बल ६० हजाराच्या मतांचा दिलेला भक्कम लीड माझ्या विरोधकाना तोडताच आला नसल्याचे त्यांनी सांगितले.
मी नेहमीच दूरदर्शी विचार करीत असल्याने दांडी-नवापूर, मुरबे खारेकुरण आणि म्हारंबळ पाडा हे तीन ब्रीज लवकरात लवकर सुरू करण्याच्या दृष्टीने केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांचे सहकार्य मिळविण्यासाठी माझे प्रयत्न सुरू झाल्याचे त्यांनी सांगितले. अर्नाळा ते अर्नाळा किल्ला ओव्हरिब्रज, मच्छीमारांच्या घराचे भूखंड त्यांच्या नावावर करणे, पालघर मध्ये अद्यावत अशा मच्छीमार्केट ची उभारणी, एडवण, डहाणू चा पाणी प्रश्न, मच्छीमारावर असलेले ४४० कोटीचे कर्ज माफ करणे, समुद्रातील हद्दीचा प्रश्न, डिझेल वरील थकीत कोट्यवधी रु पयांची सबसीडी देणे, आदी अनेक प्रश्नांच्या सोडवणुकी साठी आपण मुख्यमंत्री व उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहोत व त्यात यशस्वीदेखील होऊ, असा आत्मविश्वास गावितांनी शेवटी व्यक्त करून स्वतंत्र मत्स्य मंत्रालय स्थापन झाल्याने त्या खात्याशी निगडीत अनेक प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी २१ मच्छिमार तज्ज्ञांची समिती नेमण्यासाठी मी प्रयत्नशील राहील असेही त्यांनी शेवटी सांगितले. ह्यावेळी राजन मेहेर, ज्योती मेहेर, अशोक नाईक, केडी पाटील,मोरेश्वर वैती, अशोक आंभिरे, जयवंत तांडेल,आदींनी आपले मनोगत मांडले.