मच्छीमारांची अर्थव्यवस्था कोलमडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2019 11:10 PM2019-11-03T23:10:21+5:302019-11-03T23:10:39+5:30
डहाणूत ४५८ बोटी : व्यवसायाला घरघर; शासनाकडून भरपाईची मागणी; हंगाम असूनही चक्रीवादळामुळे समुद्रात जाता येईना
अनिरुद्ध पाटील
बोर्डी : हवामानातील बदलामुळे समुद्र खवळलेला राहून जोराचे वारे वाहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त करून ७ नोव्हेंबरपर्यंत मच्छीमारांनी समुद्रात न जाण्याची सूचना केली आहे. दरम्यान, हंगामाला प्रारंभ होऊन निम्म्यापेक्षा कमी दिवस मासेमारी झाल्याने या व्यवसायाला आर्थिक झळ पोहोचली असून मंदीचा सामना करावा लागत असल्याचे वास्तव कोळीबांधवांनी मांडले.
डहाणू तालुका हा बोंबिल, शिवंड, पापलेट, घोळ, दाढा अशा दर्जेदार मासेमारीसाठी ओळखला जातो. आॅगस्ट मध्यापासून येथे मासेमारी हंगामाला प्रारंभ झाल्यापासून सुमारे ७५ दिवसांचा मासेमारीचा कालावधी उलटला आहे. परंतु मोठे उधाण, अतिवृष्टी, विविध सण आणि २३ आॅक्टोबर ते ७ नोव्हेंबरपर्यंत दोन चक्र ीवादळांमुळे मासेमारी ठप्प असणार आहे. डहाणू तालुक्यात वरोर मासेमारी गावात ३०, धाकटी डहाणू १९०, डहाणू ७४, आगर ३१, चिखले ११, घोलवड ३ आणि सीमेलगतचे झाई बंदरात ११४ अशा सुमारे ४५८ मासेमारी बोटी आहेत. त्यांना सुरक्षेच्या दृष्टीने समुद्रात न जाण्याच्या सूचना मत्स्य व्यवसाय विभाग, बंदर विभाग, तटरक्षक दल, सागरी पोलीस यांच्याकडून देण्यात आल्या आहेत. तर काही बोटी समुद्रातून माघारी बोलवण्यात आल्या आहेत. आता ७ नोव्हेंबर पर्यंत दक्षतेचा कालावधी असल्याने मच्छीमार अस्वस्थ झाला आहे.
कर्ज घेऊन व्यवसायात गुंतवणूक केली, मात्र मासेमारीची पुरेशी संधी उपलब्ध न झाल्याने घरात जीवनावश्यक वस्तू खरेदी करायला पैसा नाही. कुटुंबाने दिवाळीही साजरी केली नाही. एका बोटीवर प्रतिदिन पाचशे रु पये प्रमाणे आठ महिन्यांसाठी चार ते पाच खलाशांना करारबद्ध केले आहे. त्यांच्या दोन्ही वेळचा नाश्ता आणि जेवणाचा आर्थिक भार व्यावसायिक उचलतो. शिवाय इंधन, बर्फ, बोटीची डागडुजी आणि अन्य खर्च वेगळाच. आज बाजारात मासे खरेदीदार आहेत, मात्र विक्रीसाठी मासेच नसल्याने होणारी घालमेल वेदनादायक असल्याचे झाई मच्छी बाजारातील कोळिणी सांगतात. उर्वरित सहा महिन्यांच्या कालावधीत होणाऱ्या मासेमारीतून घसारा, कर्ज फेड, आणि पैसे उपलब्ध होतील का? या चिंतेने व्यवसायिकांना ग्रासले आहे.
बंदर विभागाचे कामच काय? वांद्रे, डहाणू अशा दोन कार्यालयांची जबाबदारी
च्समुद्रात वादळी हवामान असल्याची सूचना देणारा ३ नंबरचा बावटा डहाणू फोर्ट येथील विभागाच्या कार्यालयानजीक शनिवारी लावला. खोल समुद्रात मासेमारी करणे धोकादायक असल्याच्या सूचना मिळाल्यानंतर मासेमारी बोटी डहाणू बंदरात आल्या.
च्मात्र शनिवारी बंदर निरीक्षक कार्यालयात नव्हते. या बाबत प्रभारी अधिकारी अभिजीत जाधव यांच्याशी संपर्क साधला असता, वांद्रे आणि डहाणू या दोन कार्यालयाची जबाबदारी असल्याने एकदिवस आड कार्यालयात हजर राहत असल्याचे त्यांनी सांगितले.
च्तर झाई येथील चौकी कार्यालयाला कुलूप असून परिसरात कचरा व घाणीचे साम्राज्य पसरले आहे. वर्षभरापूर्वी डहाणू बंदर निरीक्षक नवनीत निजाई यांची बदली झाल्यापासून या पदावर नियुक्ती झाली नसल्याची माहिती समोर आली.
च्हा प्रकार मच्छीमारांच्या जीवाशी खेळणारा असून दुर्लक्ष करणाºया वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी व्यावसायिकांनी केली आहे. तर खोल समुद्रात मासेमारी करताना वॉकी-टॉकी सारख्या उपकरणांचा अभाव असल्याने दैव भरोसे सर्व चालल्याची मच्छीमारांची खंत आहे.
आश्रयाला आलेल्या ३४ पैकी २ बोटींनी किनारा सोडला : चक्रीवादळाच्या सूचना मिळाल्यानंतर साधारणत: ५५ नॉटिकल मैल अंतरावरून सुमारे ३४ बोटी शनिवारी सायंकाळी डहाणू खाडीनजीक विसावल्या होत्या. त्या मुंबई, उरण येथील पर्ससीन बोटी असून त्यांच्याकडे नोंदणीपत्र, खलाशांचे बायोमॅट्रिक कार्ड असल्याची माहिती डहाणू मत्स्य व्यवसाय विभागाच्या परवाना अधिकारी प्रियंका भोय यांनी दिली. त्यातील दोन बोटींनी रविवारी किनारा सोडला.
ज्या प्रमाणे शेतीचे नुकसान झाल्याने पंचनामा करून शेतकºयांना नुकसान भरपाई दिली जाते. त्याच धर्तीवर मच्छीमार व्यवसायालाही आर्थिक झळ पोहचल्याने शासनाने आर्थिक आधार देण्याबाबत विचार करावा.
- राजेश मजवेलकर, मच्छीमार, झाई