तुफानी लाटांमुळे मासेमारी धोक्यात
By Admin | Published: July 21, 2015 05:02 AM2015-07-21T05:02:42+5:302015-07-21T05:02:42+5:30
एकीकडे पावसाळ्याला अजून नीटशी सुरुवातही झाली नसताना दुसरीकडे समुद्रातील तुफानी वादळी वातावरणही (खराट) अजून संपलेले नाही
हितेन नाईक , पालघर
एकीकडे पावसाळ्याला अजून नीटशी सुरुवातही झाली नसताना दुसरीकडे समुद्रातील तुफानी वादळी वातावरणही (खराट) अजून संपलेले नाही. त्यामुळे पुढील महिन्यात समुद्रात कधीही वादळी वारे, तुफानी लाटा निर्माण होऊ शकतात, या हवामान खात्याच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर १ आॅगस्टपासून समुद्रात मासेमारीला जाण्याबाबत मच्छीमारांमध्ये भीतिदायक वातावरण आहे. अशा वेळी जीवित वा वित्तहानी झाल्यास त्याला जबाबदार कोण, असा प्रश्न मच्छीमार विचारू लागले आहे.
महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम १९८१ अन्वये मागील अनेक वर्षांपासून १० जून ते १५ आॅगस्ट किंवा नारळी पौर्णिमेपर्यंत मासेमारीच्या पावसाळी बंदीचा कालावधी घोषित करण्यात येत होता. त्यामुळे नारळी पौर्णिमेला सागराची परंपरेप्रमाणे विधिवत पूजा करून नारळ अर्पण केल्यानंतरच मच्छीमार आपल्या बोटी समुद्रात पाठवित असल्याची प्रथा होती. याच दरम्यान शासनाच्या मच्छीमारांच्या विकासविषयक धोरणात दिवसेंदिवस विपरीत बदल करण्यात आल्यामुळे मच्छीमारांचे अनेक वर्षांपासूनचे प्रलंबित प्रश्न सुटण्याऐवजी त्यात वाढ झाली.
त्यातच समुद्रातील बोटींच्या संख्येत झालेली वाढ व पर्ससीन नेटसारख्या विनाशकारी जाळ्यांमुळे दिवसेंदिवस मत्स्य उत्पादनात घट होऊ लागली. त्यामुळे मत्स्य दुष्काळाचे संकट परंपरागत मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांच्या डोक्यावर घोंघावू लागले. अशा वेळी शासनस्तरावरून निवेदने, मोर्चे, आंदोलने करूनही धनाढ्य ट्रॉलर्सधारकांना छुपा पाठिंबा मिळाला. वारंवार प्रयत्न करूनही शासनाकडून अपेक्षित पाठिंबा मिळत नसल्याने शेवटी ठाणे, पालघर व गुजरात राज्यातील काही मच्छीमार संघटना, सहकारी संस्था एका व्यासपीठावर एकत्र आल्या व मत्स्य दुष्काळाचे संकट दूर करण्याच्या दृष्टीने १० जूनपासून पावसाळी मासेमारी बंदी कालावधी असताना सर्व मच्छीमारांनी १५ मेपासूनच स्वयंस्फूर्तीने निर्णय घेत आपला मासेमारी व्यवसाय बंद करून बोटी किनाऱ्यावर लावल्या.
मे महिन्यात अंडीधारक (गाबोळीवाले) व लहान पापलेटच्या पिलांची कत्तल होऊ नये, यासाठी पोटाला चिमटा काढून घेण्यात आलेल्या या निर्णयाचा सकारात्मक बदल मच्छीमारांत दिसून आला व पापलेटचे व चांगले आर्थिक उत्पन्न देणारे मासे मच्छीमारांच्या जाळ्यात मिळू लागल्याने मच्छीमारही सुखावले होते. त्यामुळे या वर्षीही मच्छीमारांनी मे महिन्यातच घेतलेल्या या निर्णयाला शासनाकडून पाठिंबा मिळेल व मच्छीमार संघटनांंनी पाळलेल्या ९२ दिवसांच्या पावसाळी बंदीचा सकारात्मक विचार होईल, अशी मच्छीमारांची धारणा होती.